चेन स्नॅचर्सचा हल्ला महिला जखमी
By Admin | Updated: August 11, 2015 03:37 IST2015-08-11T03:37:53+5:302015-08-11T03:37:53+5:30
शहरात चेन स्नॅचर्सच्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली. ही घटना सोमवारी सकाळी महाल येथील कल्याणेश्वर

चेन स्नॅचर्सचा हल्ला महिला जखमी
महाल येथील घटना : शहरातील महिलांमध्ये दहशत
नागपूर : शहरात चेन स्नॅचर्सच्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली. ही घटना सोमवारी सकाळी महाल येथील कल्याणेश्वर मंदिराजवळ घडली. यामुळे महिलांमध्ये दहशत पसरली आहे. दुसरीकडे २४ तासात सोनसाखळी हिसकावून नेण्याच्या पाच घटना घडल्याने पोलिसांची झोप उडाली आहे.
महाल येथील मेघा राजेश तोमर श्रावण सोमवार असल्याने सोमवारी सकाळी ६.३० वाजता कल्याणेश्वर मंदिरात पूजेसाठी आल्या होत्या. मेघा यांनी मंदिरासमोरच आपली दुचाकी पार्क केली आणि पूजेसाठी दूध विकत घेण्यासाठी समोरच्या जनरल स्टोअर्समध्ये गेल्या. त्याचवेळी दुकानात एक तरुण आला. त्याने दुकानदाराला ब्रेड मागितली. दुकानदार ब्रेड घेण्यासाठी मागे वळताच तो तरुण मेघा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावू लागला. अचानक झालेल्या या हल्ल्याने मेघा घाबरल्या. त्यांनी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने झटक्यात मंगळसूत्र हिसकावले. यात मेघा खाली पडल्या. दुकानदार त्या तरुणाला पकडण्यासाठी धावण्यापूर्वीच तो पळून गेला. त्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांना सूचना देण्यात आली. मेघा खाली पडल्याने त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे जखमी महिला प्रचंड घाबरलेली आहे.
तसेच फ्रेण्ड्स कॉलनी येथील ६५ वर्षीय पुष्पा पाटील या रविवारी रात्री ७.१५ वाजताच्या सुमारास आॅटोने आकारनगर चौकात पोहाचल्या. आॅटोतून उतरून त्या आपल्या घरी जाऊ लागल्या. त्याच दरम्यान पल्सरवर एक तरुण पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ आला आणि आठ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून फरार झाला. त्याचप्रकारे अशोकनगर अकोला येथील सीमा राजेश तिवारी या रविवारी रात्री ९.३० वाजता आपल्या भाचीसह शंकरनगरवरून रामनगरकडे जात होत्या. शिवाजीनगर येथील एचडीएफसी बँकेजवळ एका बाईकस्वार युवकाने त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. रविवारी सकाळी पतीसोबत दुचाकीने घरी जात असलेल्या रेखा रामानंद अग्रवाल यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. तर मुलाला कोचिंग क्लासमध्ये सोडून दुचाकीने घरी परतत असलेल्या अनिता धारपुरे यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. (प्रतिनिधी)