महिलेने नागपूर रेल्वेस्थानकावरच दिला बाळाला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 00:55 IST2019-12-03T00:54:22+5:302019-12-03T00:55:50+5:30
अंदमान एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेल्या एका महिलेला प्रसुतीवेदना सुरु झाल्या. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करत असताना या महिलेला गाडीखाली उतरविण्यात आले. तेथेच त्या महिलेने मुलीला जन्म दिला.

महिलेने नागपूर रेल्वेस्थानकावरच दिला बाळाला जन्म
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंदमान एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेल्या एका महिलेला प्रसुतीवेदना सुरु झाल्या. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करत असताना या महिलेला गाडीखाली उतरविण्यात आले. तेथेच त्या महिलेने मुलीला जन्म दिला. यात आरपीएफच्या महिला कॉन्स्टेबलने या महिलेस मदत करून पुढील उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले.
रेल्वेगाडी क्रमांक १६०३२ अंदमान एक्स्प्रेसने शबाना शब्बो (३२) रा. नामपल्ली, हैदराबाद ही महिला आपल्या तीन मुलांसह जनरल कोचने प्रवास करीत होती. अंदमान एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करीत असताना या महिलेच्या प्रसुतीवेदनेत वाढ झाली. त्यामुळे तिला इटारसी एण्डकडील भागात गाडीखाली उतरविण्यात आले. आरपीएफचे जवान बसंत सिंह यांनी ड्युटीवरील उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांना याबाबत सूचना दिली. त्यांनी लगेच निरीक्षक रवी जेम्स यांना कळवून आरपीएफच्या कॉन्स्टेबल अश्विनी मुळतकर यांना इटारसी एण्डकडील भागात महिलेच्या मदतीसाठी पाठविले. याबाबत स्टेशन उपव्यवस्थापक पंकज कुमार यांना सूचना देऊन रेल्वेच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. परंतु रेल्वे डॉक्टर पोहोचण्यापूर्वीय या महिलेने मुलीला जन्म दिला. त्यानंतर या महिलेस आरपीएफच्या महिलांनी बॅटरी कारने मेन गेटकडे आणले. तेथे रुग्णवाहिकेत बसवून या महिलेला पुढील उपचारासाठी मेयो रुग्णालयात रवाना करण्यात आले.