महिला डॉनचाही दबदबा

By Admin | Updated: May 2, 2015 02:27 IST2015-05-02T02:27:28+5:302015-05-02T02:27:28+5:30

पुरुषांचे क्षेत्र मानल्या जाणाऱ्या गुन्हेगारी विश्वात महिलांचाही चांगलाच दबदबा आहे.

Woman don | महिला डॉनचाही दबदबा

महिला डॉनचाही दबदबा


नागपूर : पुरुषांचे क्षेत्र मानल्या जाणाऱ्या गुन्हेगारी विश्वात महिलांचाही चांगलाच दबदबा आहे. काही प्रकरणात तर त्यांनी पुरुषांवरही मात केली आहे. त्यांची दहशत इतकी आहे की, पोलीसही त्यांच्याजवळ जायला मागेपुढे पाहतात. गणेशपेठ येथील दारू माफिया महिला प्रेमा दरवाडे हिच्यावर झालेल्या हल्ल्यातील तपासादरम्यान खरा प्रकार समोर आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.
२३ एप्रिलच्या रात्री प्रेमावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. तिने वस्तीतील कीर्ती हजारे, मयुर अलोणे आणि त्याचा भाऊ राहुूल अलोणे यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली होती. प्रेमाने आपला मुलगा आणि साथीदाराच्या मदतीने कीर्तीचे पती नीलेश हजारे यांचा २९ एप्रिल २०१४ रोजी खून केला होता. नीलेश हा दारू तस्करीची माहिती पोलिसांना देतो या संशयातून त्याचा खून करण्यात आला होता. पत्नी कीर्ती आणि अलोणे बंधू हे स्वत: या प्रकरणातील साक्षीदार आहेत. या प्रकरणात केवळ प्रेमालाच न्यायालयातून जामीन मिळालेला आहे. तिचा मुलगा आणि एक साथीदार वर्षभरापासून तुरुंगात आहेत. मुलाच्या जामिनासाठी किंवा प्रकरण कमजोर करण्याच्या उद्देशाने प्रेमाने स्वत:च्या हत्तेचे प्रकरण पुढे केले. त्यात तिने कीर्ती आणि अलोणे बंधूंना फसविले आहे. प्रेमाच्या एका नातेवाईकाची मयुरसोबत मैत्री आहे. प्रेमा या मैत्रीच्या विरोधात आहे. तिने आपल्या नातेवाईकाला मयुरपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे मयुरसह त्यांनाही अद्दल घडविण्याची तिची योजना होती. याची माहिती त्यांनी मयुरला सतर्क केले. २३ एप्रिल रोजी याच गोष्टीवरून मयुरसोबत प्रेमाचा वाद झाला. मयुरने तिच्यावर चाकूने हल्ला केला. प्रेमाला जे हवे होते तेच झाले. एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याच्या उद्देशाने प्रेमाने कीर्ती हजारे आणि मयुरचा भाऊ राहुलच्या विरोधातही तक्रार दाखल केली. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून खरा प्रकार उघडकीस आला.
प्रेमाने वर्षभरापूर्वी सुद्धा नीलेशचा खून योजनाबद्ध पद्धतीनेच केला होता. या योजनेत तिची सर्वात विश्वासू मादक पदार्थ तस्कर चंदा ठाकूरही सहभागी होती. पोलीस प्रेमा व चंदा या दोघांनाही वाचविण्याच्या प्रयत्नात होते. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे त्यांना आरोपी बनविण्यात आले. खुनाच्या एका वर्षानंततरही चंदा ठाकूर पोलिसांच्या हाती लागलेली नाही. चंदा लकडगंज पोलीस ठाणे परिसरात दहशतीचे दुसरे नाव आहे. तिचे लोकं मादक पदार्थांची विक्री करतात. त्याचप्रकारे उमरेड रोडवरील ‘जली’चाही मादक पदार्थ आणि अवैध दारूच्या धंद्यात चांगलात दबदबा आहे. पाचपावलीची डॉली आणि भोकीसुद्धा उत्तर नागपुरातील दहशतीचे दुसरे नाव आहे. दोघीही मादक पदार्थाच्या तस्करीत सहभागी आहेत. उत्तर नागपुरातील डॉलीने तर एका डॉनलाच संपविले होते. तिच्यावर खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. मध्य नागपुरातील शहनाज आणि सायराच्या धंद्याचीही पोलिसांना माहिती आहे. एका जुन्या डॉनची पत्नी आणि बहीण आहे. डॉनची बहिणीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. तिने एका युवकाच्या घरात घुसून त्याचा खून केला होता. इमामवाडा परिसरातील बेबी, लता आणि इंदिरासह अनेक डझनभर महिला आहेत, ज्यांना गेल्या अनेक वर्षांपासून मादक पदार्थांची तस्करी आणि अवैध दारूसाठी ओळखले जाते.
महिला गुन्हेगारांच्या दहशतीचे खरे चित्र रेल्वे स्टेशनवर पाहिले जाऊ शकते. संपूर्ण स्टेशन परिसर दोन महिलांच्या ताब्यात आहे. त्यांच्या विरुद्ध खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांनी अनेकदा तर पोलिसांनाच मारहाण केली आहे. त्यांना हाथठेल्यावर अवैध दारू विक्री करतांना पाहता येऊ शकते. बहुतांश महिला गुन्हेगार अतिशय उग्र स्वभावाच्या आहेत. अवैध धंद्यापासून होणारी कमाई लक्षात घेता पोलीस महिला गुन्हेगारांवर कारवाई करण्यास मागेपुढे पाहतात. (प्रतिनिधी)

Web Title: Woman don

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.