महिलेला चिरडले, पती गंभीर

By Admin | Updated: November 26, 2015 03:15 IST2015-11-26T03:15:41+5:302015-11-26T03:15:41+5:30

मानेवाडा चौकात एका अनियंत्रित ट्रकने बाईकस्वार दाम्पत्यास जोरदार धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहे.

Woman crushed, husband serious | महिलेला चिरडले, पती गंभीर

महिलेला चिरडले, पती गंभीर

मानेवाडा चौकातील घटना : दगडफेकीमुळे तणाव
नागपूर : मानेवाडा चौकात एका अनियंत्रित ट्रकने बाईकस्वार दाम्पत्यास जोरदार धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहे. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी दगडफेक केली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
कुंदा परमेश्वर लेंडे (३२) दुर्गानगरी उमरेड, असे मृत महिलेचे नाव आहे. कुंदाचा पती परमेश्वर हा मजुरी करतो. एक महिन्यापूर्वी मृत कुंदाचे अपेंडिक्सचे आॅपरेशन झाले होते. बुधवारी डॉक्टरांनी तिला तपासणीसाठी बोलावले होते. दोघेही बाईकने हुडकेश्वरवरून ज्ञानेश्वरनगर येथील डॉक्टरकडे जात होते. मानेवाडा चौकातील वाहतूक सिग्नल बंद झाल्याने परमेश्वरने बाईक थांबवली. त्याच्या मागून आलेला ट्रक क्र. एम.पी./२२/एन/१०६५) हा ही थांबला. सिग्नल सुरू होताच महिलेच्या पतीने बाईक सुरू केली, परंतु ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाने बाईकला धडक दिली. दोघेही ट्रकखाली आले. यात महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पती गंभीर जखमी झाला.
या अपघातामुळे परिसरात नागरिकांनी गर्दी केली. संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक करून ट्रकचे काच फोडले. घटनेची माहिती होताच महिला पीएसआय कोंकणे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचल्या. पोलिसांनी नागरिकांना नियंत्रित केले. मानेवाडा चौकात वाहतूक पोलीस तैनात असतात. त्यांच्यासमोरच अवैध वाहतूक सुरू असते. जड वाहनांची ये जा असते. परंतु पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या चौकात नेहमीच अपघात होत असतात, असा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. दोषी पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरुद्धही कारवाई करण्याची मागणी सुद्धा नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Woman crushed, husband serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.