शिवमडक्यात लांडगा आला रे आला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST2021-03-13T04:12:54+5:302021-03-13T04:12:54+5:30

गुमगाव : हिंगणा तालुक्यातील गुमगाव परिसरातील शिवमडका गावात गेल्या काही दिवसापासून लांडग्यांनी धुमाकूळ घालत जवळपास ३६ शेळ्या फस्त ...

The wolf came to Shivamadkya ... | शिवमडक्यात लांडगा आला रे आला...

शिवमडक्यात लांडगा आला रे आला...

गुमगाव : हिंगणा तालुक्यातील गुमगाव परिसरातील शिवमडका गावात गेल्या काही दिवसापासून लांडग्यांनी धुमाकूळ घालत जवळपास ३६ शेळ्या फस्त केल्या आहेत. परिणामी शेळी मालकांसह ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण आहे. गट ग्रामपंचायत गुमगावअंतर्गत येणाऱ्या शिवमडका गावात ग्रामस्थांनी शेळीसंवर्धनातून थोडा फार आर्थिक हातभार लागेल, या आशेने शेळ्या विकत घेतल्या. कधी स्वत: तर कधी राखणदाराच्या राखणीत शेळ्या चरायला नेतात. चरायला नेलेले पाळीव प्राणी सायंकाळी घरी सुरक्षित येतात. पण घरी आल्यावर मात्र सहा-सात लांडग्यांचा कळप रात्रीच्या वेळी गोठ्यातील शेळ्यांवर हल्ला चढवितो. दीड ते दोन महिन्यापासून ‘लांडगा आला रे आला’च्या दहशतीखाली अख्खे शिवमडका गाव आहे. ‘शेळी जाते जीवानिशी’ या उक्तीप्रमाणे शेळीमालक या आर्थिक नुकसानीमुळे त्रस्त झाले आहेत. वन विभाग या लांडग्याचा कायमचा बंदोबस्त लावण्यासाठी मदतीला धावून येईल का, असा सवाल शेळीमालक करीत आहेत. विशेष म्हणजे याच गावाजवळून नागपूर-मुंबई समृद्धी मार्ग पूर्णत्वास येत आहे. तर दुसरीकडे भद्र्याचा नाला गावाजवळ असल्याने लांडग्याच्या कळपाला लपायला नाल्याच्या सभोवताल झाडाझुडपांचा आधार मिळाला आहे. याच ठिकाणी लांडग्यांनी बस्तान मांडले असल्याचे जाणकारांचे मत आहे. प्राथमिक अंदाजानुसार येथे सुमारे ३६ शेळ्यांना लांडग्यांनी ठार मारले आहे.

- आमच्या डोळ्यासमोर ठार मारल्या जात असलेल्या शेळीचे संरक्षण व्हावे, यासाठी तातडीने लांडगे तसेच इतरही वन्यप्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा. नुकसान भरपाई देण्यात यावी.

- राजेश सालवटकर, शेळी मालक

---

तोंडाला रक्ताची चटक लागलेल्या लांडग्यांमुळे शेळी मालकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वन विभागाने तात्काळ दखल घ्यावी व आर्थिक मदतही करावी.

नानाभाऊ मायडुरे, शेळीमालक तथा राखणदार

Web Title: The wolf came to Shivamadkya ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.