ईपीएफमधून ४,५६५ कोटींहून अधिक रक्कम विड्रॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST2021-04-04T04:08:48+5:302021-04-04T04:08:48+5:30
नागपूर : केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन लागू केल्यावर दिनांक २५ मार्च २०२० ते ३१ मे २०२० या काळामध्ये देशभरातील ...

ईपीएफमधून ४,५६५ कोटींहून अधिक रक्कम विड्रॉल
नागपूर : केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन लागू केल्यावर दिनांक २५ मार्च २०२० ते ३१ मे २०२० या काळामध्ये देशभरातील कर्मचारी भविष्य निधी खात्यांमधून ४,५६५ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम काढण्यात आली आहे. यासोबतच गरीब कल्याण योजनेंतर्गत १ एप्रिल २०२० ते ३१ जानेवारी २०२१ या काळामध्ये २,९९४ कोटी ७१ लाख रुपयांची रक्कम या खात्यामधून काढण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणच्या आस्थापनांनी लॉकडाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांचा पीएफ भरलेला नसल्याची बाबही यानिमित्ताने पुढे आली आहे.
नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी कर्मचारी भविष्य निधी संघटन कार्यालयाकडे या संदर्भात माहिती मागितली असता, ही आकडेवारी अलिकडेच पुढे आली आहे. देशात गतवर्षी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर या काळातील उपजीविकेसाठी केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निधी खात्यामधून रक्कम काढण्यासाठी परवानगी दिली होती. या २५ मार्च २०२० ते ३१ मे २०२० काळात देशभरातील १५ लाख ४६ हजार ३५५ खातेदारांनी दावे सादर केले होते. त्यापोटी ४,५६५ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली तर गरीब कल्याण योजनेंतर्गत देशभरातून ११ लाख ८० हजार ६८९ दावे सादर झाले होते, त्यापोटी २,९९४ कोटी ७१ लाख रुपयांची रक्कम वितरीत करण्यात आली.
लॉकडाऊनच्या काळामध्ये किती आस्थापनांनी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पीएफ रक्कम जमा केली आणि ती जमा न करणाऱ्या किती आस्थापनांवर फौजदारी कारवाई केली, याचीही माहिती मागवली होती. राज्यातील बहुतेक ठिकाणच्या अनेक आस्थापनांनी ही रक्कम भरलीच नसल्याचे यातून उघड झाले आहे. मात्र, कारवाई नाममात्र झाल्याचे दिसत आहे.
नागपुरातील आस्थापनांची माहिती नील
नागपुरातील किती आस्थापनांनी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पीएफची रक्कम भरली, याची माहितीच नागपुरातील कार्यालयाकडे उपलब्ध नाही. दिनांक १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२० या काळातील अशी माहिती कार्यालयाकडे तयार नसल्याचे उत्तर नागपूर क्षेत्रीय कार्यालयाच्या जनसूचना अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही माहिती उपलब्ध नसल्याने कोणत्याही आस्थापनेवर फौजदारी कारवाई केली नसल्याचे उत्तरात म्हटले आहे.
...