लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद बुधवारी विधिमंडळात उमटले.
विधानपरिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर राजकारण का करता, असा सवाल उपस्थित करत पराभवाचे शल्य लपवायचे असेल, तर बाहेर आंदोलन करा, अशा शब्दांत उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी विरोधकांना सुनावले. संविधानामुळेच हे लोक मंत्री होऊ शकले, यांना संविधानाची इतकी अडचण का होते, असा प्रश्न काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी विधानसभेत केला. तर काँग्रेसनेच बाबासाहेबांचा अवमान केल्याचे विधानही अमित शाह यांनी राज्यसभेत केले होते, ते काँग्रेसचे नेते सांगत नाहीत, अशी आठवण मंत्री आशिष शेलार यांनी करून दिली.
राऊत यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना म्हणाले, ज्या व्यक्तीने हे विधान केले ते या संविधानामुळेच मंत्री बनले आहेत. या लोकांना बाबासाहेबांचे नाव घ्यायला, इतकी काय अडचण आहे, संविधानाबद्दल इतका द्वेष, मत्सर का वाटतो, असा मुद्दा राऊतांनी मांडला. त्यावर, मंत्री आशिष शेलार यांनी हरकत घेतली.
परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत मुद्दा उपस्थित केला. मात्र, संबंधित घटना ही संसदेत झाली असून, विधान परिषदेच्या सभागृहाशी त्याचा काहीही संबंध नाही. नियमानुसार एका सभागृहातील घटनेची चर्चा दुसऱ्या सभागृहात होत नाही या नियमावर उपसभापतींनी बोट ठेवले. यावरून विरोधक आक्रमक झाले. दानवे, अनिल परब यांच्यासह विरोधकांनी चर्चेचा आग्रह धरला. मात्र, उपसभापतींनी परवानगी नाकारली व विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. यावर डॉ. गोन्हे संतापल्या. बाबासाहेबांबाबत सरकार व सभागृहातील प्रत्येक सदस्याला आदर आहे. कार्यक्रम पत्रिका ठरवत असताना विचारले होते, तेव्हा कुणी बोलत नाही, असे उपसभापतींनी सुनावले. गोंधळातच त्यांनी पुढील कामकाज पुकारले. यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.
काँग्रेसचे आज आंदोलन
महाविकास आघाडीतर्फे गुरुवारी नागपूरच्या संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या मुद्द्यावर आंदोलन केले जाणार आहे. गुरुवारीही अधिवेशनात पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.