लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला ज्येष्ठ उद्योगपती दिवंगत रतन टाटा यांचे नाव देण्याबाबत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (दुसरी दुरुस्ती) विधेयक २०२४ मंजुरीसाठी मंगळवारी विधान परिषदेत मांडण्यात आले. सभागृहाने त्यास एकमताने मंजुरी दिली.
विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याचा प्रस्ताव सदस्य एकनाथ खडसे यांनी दिला होता. तो त्यांनी मागे घेतला. या विधेयकावर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, २०१४पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील तरुणांमध्ये कौशल्य विकासासाठी प्रयत्न करत आहेत.
राज्य सरकारने २०२२मध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठातील १० हजार विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. या विधेयकावरील चर्चेत सदस्य एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, सत्यजित तांबे, सचिन यांनी भाग घेतला. यावेळी टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात अद्ययावत कौशल्य प्रशिक्षण देण्याची सूचना करण्यात आली. शेवटी हे विधेयक एकमताने मंजूर झाले.