हिवाळी अधिवेशन: निवास वितरण नाही, आमदार कुठे थांबणार? अधिक जागेसाठी स्टोअररूम रिकाम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 06:09 IST2024-12-15T06:08:34+5:302024-12-15T06:09:33+5:30
मंत्रिमंडळ विस्तारानंतरच मंत्र्यांना सोडून आमदारांच्या खोल्यांचे केले जाणार वाटप

हिवाळी अधिवेशन: निवास वितरण नाही, आमदार कुठे थांबणार? अधिक जागेसाठी स्टोअररूम रिकाम्या
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी होत असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराने आमदारांच्या निवास व्यवस्थेचे वितरणही अडकले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतरच मंत्र्यांना सोडून आमदारांच्या खोल्यांचे वाटप केले जाईल. त्यामुळे शनिवारी सुद्धा निवासाचे वितरण होऊ शकले नाही.
सोमवारपासून अधिवेशन असल्याने अनेक आमदार शनिवारीच नागपुरात दाखल झाले आहेत. तर, काहीजण एक दिवसपूर्व म्हणजे रविवारी येतील. परंतु आमदार निवासाच्या खोल्यांचे वितरणच रखडल्याने थांबणार कुठे, असा प्रश्न पडला आहे. आमदार निवासात कोण थांबणार आणि रवी भवनात कोण थांबणार, हे रविवारी सायंकाळीच स्पष्ट होईल.
अधिक जागेसाठी स्टोअररूम केल्या रिकाम्या
आमदार निवासात अधिकाधिक आमदारांना जागा देता यावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील स्टोअररूम रिकाम्या केल्या आहे. या खोल्यांचे नूतनीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. विंग २ च्या मजल्यावर सर्व महिला आमदारांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
एकूण ३८६ खोल्या
शनिवारी दुपारपर्यंत बांधकाम विभागाला आमदार निवासाच्या खोल्यांची वाटप प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. ते विधानभवनातूनच यादीची वाट पाहत होते. बांधकाम विभागातर्फे तर सर्व आमदारांना आमदार निवासातच सामावून घेण्याची रणनीती तयार करण्यात आली. आमदार निवासातील तीन इमारतींमध्ये एकूण ३८६ खोल्या आहेत. यातील अनेक खोल्या ऑफिस आणि स्टोअररूमसाठीही वापरल्या जातात. विविध पक्षांच्या आंदोलनासाठी दोन खोल्या द्याव्या लागतात. आतापर्यंत केवळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनाच शासकीय निवास वितरित झालेले आहे.
शपथविधी राजभवनातील नैसर्गिक वातावरणात होणार
नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा रविवारी राजभवनावर होत आहे. राजभवनाच्या हिरवळीवर नैसर्गिक वातावरणात शपथ घेण्याची तयारी करण्यात आली आहे. सुमारे एक हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राजभवनाच्या प्रांगणात आयोजित या सोहळ्यात ३० मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी केली आहे. राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याप्रमाणेच हा सोहळाही 'ओपन टू स्काय' असेल.
मात्र, अचानक पाऊस आल्यास पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली आहे. प्रांगणातील हिरवळीवर १२०० खुर्च्या लावण्यात आल्या आहेत, २१ डिसेंबर १९९१ नंतर दुसऱ्यांदा शपथविधी सोहळा नागपुरात होणार आहे.
२४ बाय ६० फुटांचा मंच
राजभवनात शपथ ग्रहणासाठी २४ बाय ६० फूट आकाराचा मंच उभारण्यात येत आहेत. हा मंच ५ फूट उंच असेल. या मंचावर राज्यपाल मंत्र्यांना शपथ देतील. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहतील.