हिवाळी अधिवेशन २०२२; भोजन संपले... अर्धे पोलिस राहिले उपाशी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2022 21:11 IST2022-12-19T21:10:41+5:302022-12-19T21:11:55+5:30
Nagpur News अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या टेकडी मार्ग आणि मॉरिस कॉलेज टी पॉईंटवरील जवळपास १००हून जास्त पोलिसांवर उपाशी राहण्याची पाळी आली.

हिवाळी अधिवेशन २०२२; भोजन संपले... अर्धे पोलिस राहिले उपाशी !
: नागपूर : अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या टेकडी मार्ग आणि मॉरिस कॉलेज टी पॉईंटवरील जवळपास १००हून जास्त पोलिसांवर उपाशी राहण्याची पाळी आली. कंत्राटदाराने पाठविलेले भोजन संपल्यामुळे या पोलिसांना भोजन मिळाले नाही. तर ज्यांना भोजन मिळाले त्या पोलिसांनी हे भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार केली आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी विविध जिल्ह्यांतून पोलिसांना उपराजधानीत तैनात करण्यात आले आहे. यात टेकडी मार्ग आणि मॉरेस कॉलेज टी पॉईंट येथे विधानभवनावर काढण्यात येणारे मोर्चे अडविण्यात येत आहेत. या दोन्ही ठिकाणी जवळपास ३०० पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी या पोलिसांसाठी भोजन आले. मात्र १००च्या वर पोलिसांचे भोजन राहिले असताना भोजन संपले. भोजन संपल्यामुळे पोलिसांचा नाईलाज झाला. त्यांना दुपारी चार वाजेपर्यंत दुसरे भोजन येणार असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना भोजन पुरविण्यासाठी एका कंत्राटदाराला पोलिस मुख्यालयातून कंत्राट देण्यात आले आहे. ८५ रुपये प्रति थाळी या दराने तो पोलिसांना भोजन पुरवत आहे. परंतु, पुरविण्यात येणारे भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनासाठी आपले घरदार, शहर सोडून आलेल्या पोलिसांवर संबंधित कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे उपाशी राहण्याची वेळ आली.
.............