हिवाळी अधिवेशन २०२२; विधानभवनात प्रथमच हिरकणी कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2022 20:12 IST2022-12-19T20:11:09+5:302022-12-19T20:12:14+5:30
Nagpur News राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात सोमवारपासून सुरू झाले. विधिमंडळ अधिवेशनाच्या इतिहासात विधानभवनाच्या दुसऱ्या माळ्यावर प्रथमच हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे.

हिवाळी अधिवेशन २०२२; विधानभवनात प्रथमच हिरकणी कक्ष
नागपूर : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात सोमवारपासून सुरू झाले. विधिमंडळ अधिवेशनाच्या इतिहासात विधानभवनाच्या दुसऱ्या माळ्यावर प्रथमच हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे.
महिला आमदारांसह महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बाळांचे संगोपन, त्यांच्या स्तनपानासाठी सुरक्षित जागा म्हणून ही सोय करण्यात आली आहे.
या कक्षात दोन महिला अधिकाऱ्यांसह तीन आरोग्यसेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाळाला खेळण्यासाठी खेळण्याचे साहित्य, स्तनपानाची सोय तसेच महिला व बाळांना होणाऱ्या विविध आजारांबाबत मार्गदर्शन, भित्तीपत्रकांसोबत बीपी, शुगर व हिमोग्लोबीन यावर प्राथमिक औषधांची व्यवस्था या कक्षात करण्यात आली आहे. गोवर आजारावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. आतापर्यंत या कक्षाला आरोग्य संचालकांसह, उपसंचालक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. राजश्री राऊत, डॉ. क़ांचन राठोड, आरोग्यसेविका अरुणा लांडगे, सोनाली घुमडे, संगीता मोहोड येथे कार्यरत आहेत.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील देवळालीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांनी अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन विधिमंडळात प्रवेश केला होता. त्यांनी आपण विधिमंडळात हिरकणी कक्षाची निर्मिती करावी, अशी मागणी सरकारला करणार असल्याचे सांगितले होते. परंतु, त्याआधीच सरकारने हिरकणी कक्ष तयार केला आहे.