हिवाळ्यातील परदेशी पाहुणे लागले परतीला ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:09 IST2021-03-17T04:09:28+5:302021-03-17T04:09:28+5:30
नागपूर : पक्ष्यांना काेणत्या देशाची सीमा थांबवू शकत नाही, असे म्हणतात. गेली चार-पाच महिने विदर्भातील नद्या, तलाव, पाणथळ जमिनी, ...

हिवाळ्यातील परदेशी पाहुणे लागले परतीला ()
नागपूर : पक्ष्यांना काेणत्या देशाची सीमा थांबवू शकत नाही, असे म्हणतात. गेली चार-पाच महिने विदर्भातील नद्या, तलाव, पाणथळ जमिनी, शेतशिवार ज्यांच्या किलबिलाटाने फुलला हाेता, ते परदेशी पाहुणे आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. ऊन वाढू लागल्याने त्यांना आता थंड प्रदेशातील त्यांच्या घराची ओढ लागली असून, ते मार्गस्थ झाले आहेत. हिवाळी पाहुणे जात असले तरी उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे मात्र आगमन सुरू झाले आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर युराेप, अमेरिका, रशिया, मंगाेलिया अशा देशातील वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी हजाराे किलाेमीटरचा प्रवास करीत आपल्या देशात आणि मजल-दरमजल करून विदर्भातही पाेहचत असतात. तलाव, पाणथळ जमिनी, शेतावर या पक्ष्यांची शाळा भरलेली असते. पावसाळा व पुढे हिवाळा असे चार-सहा महिने तरी त्यांचा मुक्काम येथे असताे. पक्षी अभ्यासक यादव तरटे पाटील यांच्यानुसार त्यांच्या मूळ अधिवासाकडे थंडी वाढत असल्याने ते आपल्याकडे माेर्चा वळवतात. यातील काही हिमालयातून व त्या पलीकडच्या देशातून येत असतात. वातावरणात गारवा राहत असल्याने त्यांना आकर्षण असते. यातील बहुतेक पक्षी केवळ उदर भरणाच्या गरजेपाेटी इकडे येतात, पण काही प्रजननाच्या दृष्टीनेही येतात. त्यामुळे अनेक पक्षी पिलांसह परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मात्र त्याबराेबर उन्हाळी पक्ष्यांचेही आगमन हाेत आहे.
- परतीला लागलेले हिवाळी पक्षी
मोठी टिबुकली, राजहंस, काळा ढोक, कांड्या करकोचा, कलहंस, गजरा, परी, सरग बड्डा, सुंदर बटवा, चिमण शेंदऱ्या, शेंदूर बड्डा, ठिपकेदार गरु, निलय, कुलंग, सोन टिटवा, लहान वाळू टिटवा आदी पक्षी हजाराेच्या संख्येने परतीच्या मार्गाला लागले आहेत.
उन्हाळी पाहुणे आले
नदी टिटवी, राखी डोक्याची टिटवी, मोठा आर्ली आदी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. याशिवाय आणखीही काही पक्ष्यांचे, मध्य आशिया, युराेप व हिमालयाच्या भागातून आगमन हाेणार आहे. उन्हाळ्यात येत असले तरी त्यांनाही पाणथळ जमिनीचाच आधार घ्यावा लागताे, हे विशेष.
हिवाळ्यात आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांच्या परतीची सुरुवात झाली आहे. युरोप, मध्य आशिया, युरेशिया, मंगोलिया आदी भागातून येणारे हे विदेशी पक्षी पर्यावरण संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावतात. ऊन वाढू लागल्याने ते आता त्यांच्या मायदेशी परत जात आहेत.
- यादव तरटे पाटील, सदस्य - राज्य वन्यजीव मंडळ