मजुरी करणाऱ्या रिनाला व्हायचेय डॉक्टर
By Admin | Updated: June 14, 2017 01:11 IST2017-06-14T01:11:39+5:302017-06-14T01:11:39+5:30
अंगी गुणवत्ता असूनही ती परिस्थितीमुळे नेहमी तडजोड करीत आली. तथापि, प्रामाणिकपणा, जिद्द व चिकाटीच्या बळावर तिने अखेर आपले स्वप्न साकार केलेच.

मजुरी करणाऱ्या रिनाला व्हायचेय डॉक्टर
श्रमाच्या बळावर गाठले ७० टक्के गुण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंगी गुणवत्ता असूनही ती परिस्थितीमुळे नेहमी तडजोड करीत आली. तथापि, प्रामाणिकपणा, जिद्द व चिकाटीच्या बळावर तिने अखेर आपले स्वप्न साकार केलेच. प्रतिकूल परिस्थितीत शाळेने केलेल्या मदतीच्या हाताचे संधीचे सोने करीत सुरक्षा रक्षकाच्या मुलीने दहावीत ७० टक्के गुण मिळविले.
रिना सावनलाल मलगाम त्या विद्यार्थिनीचे नाव. मनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा, उंटखाना येथील ती विद्यार्थिनी आहे.
मंगळवारी दहावीचा निकाल समोर येताच पास झालेल्या मुलांचा एक वेगळा थाट सर्वत्र दिसून आला. कोणी त्यांना पेढ्यांनी भरवीत होते, कोणी हारतुरे देऊन शुभेच्छा देत होते, कोणी त्याच्या नवनवीन मागण्या पूर्ण करीत होते तर कोणी त्याच्यासाठी काय करू, काय नको यासाठी झटत होते. पण रिनाला ७० टक्के गुण मिळवूनही तिचे कौतुक करणारे कोणीच नव्हते. नेहमीप्रमाणे ती आपल्या काकासोबत कामावर आली.
रेशीमबाग येथील एका बंगल्याच्या बांधकामासाठी पहिल्या मजल्यावर विटा पोहोचवीत होती. ‘लोकमत’ने तिला गाठून शुभेच्छा देताच ती रडायलाच लागली. त्या आनंदाच्या भरात आपल्या वडिलांचा मोबाईलनंबरही विसरली. कसेतरी काकाकडून गावाला गेलेल्या आई-वडिलांना ही सुखद बातमी दिली. तिकडूनही रडण्याचा आवाज आला.
उंटखाना येथील रमाई बुद्धविहाराच्या बाजूला एका बंद इमारतीच्या रखवालीची जबाबदारी रिनाच्या वडिलांवर आहे. याच इमारतीच्या परिसरात टिनाची झोपडी करून हे कुटुंब राहते. काही कामानिमित्त तिचे आई-वडील मंगळवारी गावाला गेले होते, तर ती काकासोबत मजुरीच्या कामावर आली होती. रिनाला बोलते केल्यावर ती म्हणाली, माझ्या घराची गरिबी दूर करण्यासाठी शिक्षण हाच पर्याय आहे. दहावीत गणित विषयाची भीती वाटत होती.
परंतु शाळेतील शिक्षकांनी मदत केली. सध्या सुट्या असल्याने आईला मजुरीच्या कामात मदत करते, असे म्हणून भावुक झालेली रिना म्हणाली, खूप मेहनत घ्यायची इच्छा आहे सर, याच बळावर डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून आहे. घरची स्थिती पाहता हे कठीण असले तरी अशक्य नाही, असा विश्वास आहे.