तुम्हाला सर्वच देणार काय?
By Admin | Updated: March 6, 2015 00:29 IST2015-03-06T00:29:00+5:302015-03-06T00:29:00+5:30
नागपूरला ‘आयआयएम’, ‘एम्स’, ‘ट्रीपल आयटी’ यासारख्या मोठ्या संस्था मिळाल्या आहेत. आता तुम्हाला सर्वच देणार काय? तुम्हाला देत असताना दुसऱ्यांचा ‘बॅकलॉग’ तयार व्हायचा!

तुम्हाला सर्वच देणार काय?
नागपूर : नागपूरला ‘आयआयएम’, ‘एम्स’, ‘ट्रीपल आयटी’ यासारख्या मोठ्या संस्था मिळाल्या आहेत. आता तुम्हाला सर्वच देणार काय? तुम्हाला देत असताना दुसऱ्यांचा ‘बॅकलॉग’ तयार व्हायचा! हे शब्द दुसऱ्या तिसऱ्या कुणाचेही नसून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे आहेत. उपराजधानीतील बहुप्रतिक्षित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुद्यावर त्यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी प्रांतिक भेदभाव करणारे हे वक्तव्य केले. विदर्भाचा इतक्या वर्षांचा अनुशेष भरून निघण्याची सुरुवात झाली असताना राज्यातील जबाबदार मंत्र्यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या अडीच महिन्यांपासून नागपुरात ‘स्वाईन फ्लू’ ची दहशत असताना वैद्यकीय शिक्षण खात्याचादेखील भार सांभाळणारे विनोद तावडे यांनी दुपारच्या सुमारास मेयो इस्पितळाला भेट दिली. यावेळी त्यांना उपराजधानीतील शैक्षणिक क्षेत्राबद्दलदेखील विचारणा करण्यात आली. शासनाच्या उदासीन धोरणामुळे तीन वर्षांपूर्वी घोषित झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अजूनही कागदावरच असून जमिनीचे हस्तांतरण झालेले नाही. त्यावर शासनाची भूमिका काय याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. यावर तावडे यांनी सर्वांनाच धक्का देणारे उत्तर दिले. तुम्हाला ‘आयआयएम’, ‘ट्रीपल आयआयटी’सारख्या संस्था दिल्या. अजून काय द्यायचे? सर्व तुम्हालाच दिले तर इतर विभागांचा ‘बॅकलॉग’ तयार व्हायचा, असे त्यांनी प्रतिपादन केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुद्याला त्यांनी बगलच दिली.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी नागपुरातील ७.४७ एकर जागा अंतिम करण्यात आली आहे. परंतु ‘एनआयटी’च्या अखत्यारितील या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. शासनाने या जागेसाठी २१ कोटी रुपयांचा निधी अद्याप उपलब्ध करुन दिलेला नसून याची ‘फाईल’ मंत्रालयातच आहे. (प्रतिनिधी)