दोन सदस्यीय प्रभाग अपक्ष तारणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:08 IST2021-09-25T04:08:56+5:302021-09-25T04:08:56+5:30
कामठी : नगरपालिका निवडणुकीत दोन सदस्यीय प्रभाग ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे नवीन वर्षात निवडणूक होऊ घातलेल्या ...

दोन सदस्यीय प्रभाग अपक्ष तारणार का?
कामठी : नगरपालिका निवडणुकीत दोन सदस्यीय प्रभाग ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे नवीन वर्षात निवडणूक होऊ घातलेल्या कामठी नगर परिषद क्षेत्रातही राजकीय मोर्चबांधणीला वेग आला आहे. दोन सदस्यीय प्रभाग पद्धती राजकीय पक्षांसाठी सोईची ठरणारी असली, तरी अपक्षांचा मात्र मैदान मारताना निश्चितच कस लागणार आहे. कामठी नगर परिषदेत दशकभरापासून काँग्रेसची सत्ता आहे. कामठी मतदार संघात आमदार भाजपचे तर नगराध्यक्ष काँग्रेसचे असल्याने विकासकामांवर या दोन्ही पक्षांत खडाजंगी होताना दिसते. एकूण ३१ नगरसेवक असलेल्या कामठी नगर परिषदेत २०१७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोहम्मद शहाजहा शफात अन्सारी यांना १६,६३० मते मिळाली होती. यावेळी भाजप-रिपब्लिकन एकता मंचचे अजय कदम यांना १४,२६८ तर भाजप बंडखोर रंजित सफेलकर यांना ६,५३४ मते मिळाली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे १५, भाजपचे ८, बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे २ तर शिवसेना, बसपा, एमआयएमचा प्रत्येकी एक व तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. आगामी निवडणूक दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याने राजकीय पक्षांचे उमेदवार मोर्चेबांधणीला लागले आहेत.
--
१ नगरसेवक वाढणार
१ जानेवारी २०२१च्या मतदार नोंदणीनुसार कामठी शहरात ८६ हजार ७३६ मतदार आहेत. यात ४२ हजार ७३९ पुरूष, ४३,९९७ महिला मतदारांचा समावेश आहे. शहरात नगरसेवकांची संख्या ३२ राहण्याची शक्यता आहे. प्रत्येक प्रभागात ५ ते ७ हजार मतदार राहणार असल्याची माहिती कामठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी दिली.