पुन्हा लॉकडाऊन लागणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:14 IST2021-03-13T04:14:55+5:302021-03-13T04:14:55+5:30
सावरगाव : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात १५ ते २१ मार्चदरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात ...

पुन्हा लॉकडाऊन लागणार काय?
सावरगाव : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात १५ ते २१ मार्चदरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याची धास्ती आता ग्रामीण भागातील व्यापारी, शेतकरी आणि शेतमजुरांनी घेतली आहे. ग्रामीण भागात लॉकडाऊन झाल्यास पुन्हा आर्थिक घडी विस्कळेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गतवर्षी झालेल्या लॉकडाऊनचा फटका शेतकऱ्यांना अधिक बसला. शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही. यासोबत शेतमजुरांचा रोजगार हिरावला आहे. गावागावात बेरोजगारांची फौज तयार झाली. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला खीळ बसली. गतवर्षी लॉकडाऊनमुळे मृगबहाराची संत्री बेभाव विकावी लागली. घरी असलेला कापूस विकायला २-३ महिने लागले. त्यातच पडल्या भावात कापूस शेतकऱ्यांना विकावा लागला. यंदाही अंबियाबहाराच्या संत्र्याला योग्य भाव मिळाला नाही. परतीच्या व अवकाळी पावसाने रबी व खरीप पिकाचे नुकसान झाले. अशात लॉकडाऊन झाल्यास स्थिती आणखी बिघडेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
---
गतवर्षी लॉकडाऊनमुळे शेतमाल बेभाव विकावा लागला. आता पुन्हा लॉकडाऊन लागला तर तीच स्थिती निर्माण होईल. खरीप हंगामात शेती कशी करावी, हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार नाही, असा निर्णय शासनाने घ्यावा.
मोहन रेवतकर, शेतकरी, सावरगाव.
--
गतवर्षी लॉकडाऊनमुळे चार महिने व्यवसाय बंद राहिला. मोठे आर्थिक नुकसान झाले. कशीबशी गाडी रुळावर येत असताना पुन्हा लॉकडाऊनचे भूत मानगुटीवर बसले आहे.
किशोर दवणे, व्यावसायिक.