यंदा ९४वे मराठी साहित्य संमेलन होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST2021-06-16T04:10:42+5:302021-06-16T04:10:42+5:30

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाच्या तीव्रतेवर लॉकडाऊनचा निर्णय शासन घेते आणि ते उठवतेही. मात्र, ...

Will there be 94th Marathi Sahitya Sammelan this year? | यंदा ९४वे मराठी साहित्य संमेलन होणार का?

यंदा ९४वे मराठी साहित्य संमेलन होणार का?

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या तीव्रतेवर लॉकडाऊनचा निर्णय शासन घेते आणि ते उठवतेही. मात्र, संक्रमणाच्या धोक्याने छोट्या छोट्या कुटुंबांच्या नियोजनाचा बोजवारा उडलाय. जेथे शासन, प्रशासन, यंत्रणा हतबल झाले, तेथे मोठमोठी महामंडळे, संस्थांची काय बिशाद. साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राचे तर पार हाल झाले आहेत. या सगळ्यांचा विचार करताना नाशिक येथे नियोजित ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होईल का, हा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे.

जानेवारी २०२० मध्ये ९३वे साहित्य संमेलन उस्मानाबाद (धाराशिव) येथे पार पडल्यानंतर कोरोना संक्रमणाच्या पहिल्या लाटेने आक्रमण केले आणि मार्च २०२० पासून संपूर्ण भारत लॉकडाऊनमध्ये गेला. लाट ओसरल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने ९४व्या संमेलनाची तयारी केली. अनेक वादावादीनंतर नाशिक हे संमेलनस्थळ म्हणून निश्चित झाले आणि मार्च महिन्यातील तारखाही निश्चित झाल्या. मात्र, दरम्यान फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाने तोंड काढले आणि पहिल्या पेक्षाही दुसरी लाट चौपटीने भयंकर ठरली. कोणत्याही स्थितीत संमेलन पार पडणार, असे म्हणणारे महामंडळ अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी अखेर संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून महामंडळ क्वारंटाईनमध्ये गेल्याची स्थिती आहे. संमेलन स्थगित झाल्यानंतर महामंडळाच्या संपूर्ण हालचालीच बंद पडल्या आहेत. संक्रमणाचा जोर ओसरत असून, टप्प्याटप्प्यात लॉकडाऊनही मागे घेतले जात आहे. मात्र, संक्रमणाच्या पहिल्या लाटेनंतरचा गाफीलपणा आणि वर्तमानातील भयानक स्थिती बघता शासन सार्वजनिक कार्यक्रमांवर कठोर निर्बंध आणणार हे निश्चित. अशा स्थितीत नाशिक येथील नियोजित ९४वे साहित्य संमेलन यंदा होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे. त्यातच कोरोना काळात पार पडलेल्या इतर लहानमोठ्या साहित्य संमेलनांप्रमाणे महामंडळ ऑनलाईनचा पर्याय निवडेल का, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे.

----------------

विश्व मराठी संमेलन ऑनलाईन

गेल्याच महिन्यात विश्व मराठी परिषदेच्या वतीने ऑनलाईन संमेलन पार पडले. या संमेलनात देश-विदेशातून मोठ्या संख्येने साहित्यप्रेमींनी सहभाग नोंदविला होता. त्याच अनुषंगाने १ जुलैपासून पुन्हा एकदा परिषदेतर्फे विविध ऑनलाईन कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याच धर्तीवर नव्या युगाची नवी हाक आणि गरज म्हणून साहित्य महामंडळानेही असला प्रयोग राबविण्यास हरकत नसल्याची चर्चा साहित्य वर्तुळात सुरू आहे.

----------------

ऑनलाईनचा पर्याय शक्यच नाही

इतर कुठल्याही कार्यक्रमांची आणि मराठी साहित्य संमेलनाची तुलना करणे शक्य नाही. साहित्य संमेलन म्हणून प्रत्यक्ष भेटी-गाठीतून विचारांचे आदान-प्रदान होणारा हा हक्काचा सोहळा आहे. आम्ही संमेलन घेण्यास उत्सुक आहोत. त्यासाठी कोरोना संक्रमणाच्या स्थितीचे अवलोकन केले जाईल. या संदर्भात जुलैच्या अखेर बैठक बोलाविण्यात येईल. मात्र, शासन-प्रशासनाचे काय नियम असतात, त्यावरच बैठक आणि संमेलनाच्या नियोजनाचे ठरणार आहे.

- कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

...............

Web Title: Will there be 94th Marathi Sahitya Sammelan this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.