खरच दोन हजार कोटी रूपयांमधून सिंचनाचा अनुशेष दूर होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2024 18:49 IST2024-02-28T18:48:29+5:302024-02-28T18:49:46+5:30
१.३० लाख रूपये प्रति हेक्टरचा खर्च आता ७.५ लाख रूपयांवर पोहोचला

खरच दोन हजार कोटी रूपयांमधून सिंचनाचा अनुशेष दूर होणार?
नागपूर : विदर्भातील सिंचन अधिशेष दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु २०२६ पर्यंत अनुशेष निर्मुलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा निधी पुरेसा ठरणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उल्लेखनीय म्हणजे वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतील सिंचन अनुशेष २०११ मध्ये संपवण्यात आल्याचा सरकारचा दावा आहे.
मात्र अमरावती, अकोला, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्याचे सिंचन अनुशेष कायम आहे. अलीकडील आकडेवारीनुसार, या जिल्ह्यांमध्ये ७३,०११ हेक्टरचा अनुशेष अजूनही कायम आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सरकारने अमरावती आणि वाशिमचा अनुशेष जून २०२४, अकोला जून २०२५ आणि बुलडाणा जून २०२६ संपवण्यात येईल, असे म्हटले आहे. जून २०२३ पर्यंत या चार जिल्ह्यांत ७३,०११ हेक्टरचे अनुशेष होते. आता यावर मात करण्यासाठी सरकारने दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
पूर्वीच्या तंत्रज्ञानानुसार हा निधी ठीक आहे. पण भविष्यात ते अपुरे ठरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पूर्वी कालवे खुले राहत होते. त्यावर १.३० लाख रुपये प्रति हेक्टर इतका खर्च यायचा. आता पीडीएल (पाइप लाईनद्वारे पाणी पोहोचवणे) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्याची सरासरी किंमत सुमारे ७.५ लाख रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. अशा परिस्थितीत ७३,०११ हेक्टरवरील अनुशेष भरून काढण्यासाठी ५,४७५ कोटी रुपयांची आवश्यकता पडेल.
तरतूद पुरेशी नाही
विदर्भवादी आणि अनुशेष संशोधक नितीन रोंघे यांनी सरकारी आकडेवारीवर प्रश्न उपस्थित करत प्रत्यक्षात आजही प्रत्येक जिल्ह्यात अनुशेष असल्याचे सांगितले. हे अनुशेष अद्याप मोजले गेले नाही. दोन वर्षांत अनुशेष पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याने दोन हजार कोटी रुपये खर्च केले जातील. ते पुरेसे नाही. खारपाणपट्ट्याबाबतही ठोस पुढाकार घेतला नाही. आता वैधानिक विकास मंडळ नाही, त्यामुळे राज्य सरकार जे म्हणेल ते मान्य करावे लागेल.
विदर्भातील सिंचनाच्या भौतिक अनुशेषाची स्थिती
जिल्हा - जून २०१९ - जून २०२३
अमरावती - ६७,७०७ हेक्टर - १०,५१० हेक्टर
अकोला - ४३, ९४० हेक्टर - २७,००६ हेक्टर
वाशिम - ५६०८ हेक्टर - ३६४५ हेक्टर
बुलडाणा - ४५,८८४ हेक्टर - ३१,८५० हेक्टर
एकूण - १, ६३, १३९ हेक्टर - ७३,०११ हेक्टर