दीक्षाभूमीलगतची जागा स्मारकासाठी मिळणार का?
By Admin | Updated: April 8, 2017 02:31 IST2017-04-08T02:31:36+5:302017-04-08T02:31:36+5:30
दीक्षाभूमीवर येणारे अनुयायी आणि एकूणच गर्दी लक्षात घेता येथील जागा आता अपुरी पडू लागली आहे.

दीक्षाभूमीलगतची जागा स्मारकासाठी मिळणार का?
नागपूर : दीक्षाभूमीवर येणारे अनुयायी आणि एकूणच गर्दी लक्षात घेता येथील जागा आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे दीक्षाभूमीला लागून असलेली जागा स्मारकासाठी मिळावी, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत ही बाब असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीक्षाभूमीच्या भेटीमुळे पुन्हा एकदा स्मारक समिती व आंबेडकरी अनुयायांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
दीक्षाभूमी स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. चारही बाजूंनी चार मुख्य द्वार आहेत. स्मारक आणि थेट रस्त्यावरील मुख्य गेटचा विचार केला तर तीन द्वार तयार झाले आहेत. स्मारकाचे चौथे गेट जागेअभावी पूर्ण होऊ शकले नाही. दीक्षाभूमीला लागून केंद्रीय कृषी विभागाची जागा आहे. थोडी जागा स्मारकासाठी मिळाली तर चौथे गेटही पूर्ण होऊ शकते. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी स्मारकात होणारी गर्दी येथील रस्ता झाल्यास कमी होण्यास मदत होईल. तसेच स्मारकासमोरील आरोग्य विभागांतर्गत माता कचेरीची रिकामी जागा स्मारकासाठी उपलब्ध व्हावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्मारक समितीच्यावतीने सातत्याने केली जात आहे. मुख्यमंत्र्यांपासून तर केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वांकडे ही मागणी करण्यात आली आहे. सर्वांनीच आश्वासने दिली. परंतु आंबेडकरी अनुयायांची मागणी मात्र पूर्ण होऊ शकलेली नाही.
आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी हे स्वत: नागपूरचे आहेत. त्यांना या मागणीची व स्मारकासाठी ही जागा किती आवश्यक आहे याची परिपूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांना याबाबत जाणीव करून दिली तर ही जागा निश्चितच दीक्षाभूमी स्मारकाला मिळेल, अशी आंबेडकरी अनुयायांची अपेक्षा आहे.(प्रतिनिधी)
शासनाच्या ‘मास्टर प्लॅन’ अंतर्गतही जागेची आवश्यकता
राज्य शासनाने दीक्षाभूमीला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. त्याअंतर्गत दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. यासाठी दिल्लीतील एका कंपनीला दीक्षाभूमीच्या विकासाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यास सांगण्यात आले आहे. दिल्लीतील कंपनीने ह प्लॅन तयार केला आहे. राज्य सरकार व दीक्षाभूमी स्मारक समितीपुढे या आराखड्याचे सादरीकरण सुद्धा झाले आहे. त्या प्लॅनमध्ये कृषी विभागाच्या जागेसोबतच दीक्षाभूमी समोरील माता कचेरीची जागा सुद्धा दीक्षाभूमीला लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या मास्टर प्लॅननुसार दीक्षाभूमीचा विकास करायचा असेल तर या दोन्ही जागा दीक्षाभूमीसाठी आवश्यक आहे.
मायावती यांनीही व्यक्त केली होती इच्छा
बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना दीक्षाभूमीला आल्या होत्या. यावेळी त्यांनी दीक्षाभूमीचे स्मारक हे थेट वर्धा रोडवरून दिसावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यासाठी माता कचेरीची जागा स्मारकाला मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. आपले सरकार आल्यास निश्चित ही जागा दीक्षाभूमीला उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासनही मायावती यांनी त्यावेळी दिले होते.