शंभरीत तरी ‘प्लेसमेंट’ वाढणार का?
By Admin | Updated: July 23, 2014 00:54 IST2014-07-23T00:54:38+5:302014-07-23T00:54:38+5:30
गेल्या काही वर्षांपासून तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांची ‘क्रेझ’ प्रचंड प्रमाणात ओसरू लागली आहे. त्यातही विद्यार्थ्यांचा शासकीय तंत्रनिकेतन संस्थेवर विश्वास कायम होता. परंतु शंभरी गाठणाऱ्या

शंभरीत तरी ‘प्लेसमेंट’ वाढणार का?
शासकीय तंत्रनिकेतन : ढिसाळ धोरणांमुळे विद्यार्थ्यांना फटका
नागपूर : गेल्या काही वर्षांपासून तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांची ‘क्रेझ’ प्रचंड प्रमाणात ओसरू लागली आहे. त्यातही विद्यार्थ्यांचा शासकीय तंत्रनिकेतन संस्थेवर विश्वास कायम होता. परंतु शंभरी गाठणाऱ्या या संस्थेत गेल्या काही वर्षांपासून ‘कॅम्पस प्लेसमेंट’ घसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मध्य भारतातील नामांकित संस्थेत बोटावर मोजण्याइतपत कंपन्या ‘कॅम्पस’मुलाखती घेण्यासाठी येत आहेत. शंभरीचा उत्सव साजरा करणाऱ्या या संस्थेत जास्तीत जास्त नामांकित कंपन्या याव्यात यासाठी प्रशासन पुढाकार कधी घेणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
एक काळ होता की शासकीय तंत्रनिकेतन राज्यातील एक महत्त्वाची संस्था होती. आजदेखील संस्थेमध्ये प्रवेश मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतु विद्यार्थ्यांच्या अपेक्षा मात्र पूर्ण होत नसल्याचे दिसून येते. येथील विद्यार्थ्यांना रोजगार देण्यास कंपन्यादेखील उत्साहित असायच्या. मात्र मागील काही वर्षांपासून ‘कॅम्पस प्लेसमेंट’चा टक्का घसरणीस लागला आहे. ३ वर्ष अगोदर सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांची निरनिराळ्या कंपन्यांकडून निवड व्हायची. परंतु मागील सत्रात केवळ ७१ विद्यार्थ्यांना ‘प्लेसमेंट’ मिळाले. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ ८ ते १० कंपन्या येथे ‘इंटरव्ह्यू’ घेण्यासाठी आल्या होत्या.
यासंदर्भात येथील अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली असता पदविका घेतल्यानंतर बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकी पदवीकडे जातात.
त्यामुळे ‘कॅम्पस प्लेसमेंट’मध्ये नोकरी मिळाल्यावर विद्यार्थी नकार कळवितात. यामुळे फारशा कंपन्या येण्यास उत्सुक नसतात, असे उत्तर विद्यापीठाचे प्रभारी प्राचार्य दीपक कुळकर्णी यांच्याकडून सांगण्यात आले. प्रशासनाकडून ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या घसरत्या टक्क्याबाबत निरनिराळी कारणे देण्यात येत असली तरी ढिसाळ धोरणच याला कारणीभूत असल्याची माहिती संस्थेतीलच सूत्रांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांवर खापर का?
नागपुरातील शासकीय तंत्रशिक्षण संस्थेत सुमारे ८४० जागा आहेत. यातील काही विद्यार्थी अभियांत्रिकी पदवीसाठी जातात हे खरे आहे. परंतु बहुतांश विद्यार्थी सामान्य कुटुंबातून येत असल्याने त्यांना चांगल्या रोजगाराची अपेक्षा असते. संस्थेत शासकीय सोयीसुविधा उपलब्ध आहेत. शिवाय ‘प्लेसमेंट सेल’देखील आहे. मागील वर्षी ८ ते १० कंपन्या ‘कॅम्पस’मुलाखती साठी आल्या होत्या. यात काही नामांकित कंपन्यांचा समावेश होता. परंतु मोठ्या प्रमाणात नामांकित कंपन्यांना ‘कॅम्पस’मुलाखतीसाठी संस्थेत आणण्यास प्रशासनाला यश आलेले नाही. शिवाय येणाऱ्या कंपन्यातील काही अपवाद सोडले तर विद्यार्थ्यांना फारसे ‘पॅकेज’देखील देण्यात येत नाही. अशा स्थितीत मग विद्यार्थ्यांसमोर महाविद्यालयाबाहेर पडून नोकरी शोधण्याशिवाय पर्याय नसतो. ८०० पैकी केवळ ७१ विद्यार्थी म्हणजे ‘प्लेसमेंट’चा आकडा केवळ ९ टक्के इतका आहे. प्रशासनाचा दावा आहे की विद्यार्थी अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतात. परंतु खरोखरच ९० टक्के विद्यार्थ्यांचा यात समावेश असतो का याचा प्रशासनानेच विचार करायला हवा, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.