पतंजलीचे उत्पादन डिसेंबरपर्यंत खरंच सुरू होणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:09 IST2021-09-26T04:09:10+5:302021-09-26T04:09:10+5:30
नागपूर : बाबा रामदेव यांच्या मिहान-सेझमधील पतंजली फूड अँड हर्बल पार्क लि.चे भूमिपूजन १० सप्टेंबर २०१६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री ...

पतंजलीचे उत्पादन डिसेंबरपर्यंत खरंच सुरू होणार का?
नागपूर : बाबा रामदेव यांच्या मिहान-सेझमधील पतंजली फूड अँड हर्बल पार्क लि.चे भूमिपूजन १० सप्टेंबर २०१६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाले होते. त्यावेळी एक हजार ते १२०० कोटींच्या गुंतवणुकीतून विदर्भातील १० हजार युवकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार देण्याची घोषणा बाबा रामदेव यांनी केली होती; पण पाच वर्षांनंतरही प्रकल्पात मशिनरींची उभारणी झालेली नाही. डिसेंबर अखेरीस प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असली, तरीही उत्पादन खरंच सुरू होणार का आणि विदर्भातील युवकांना रोजगार मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मिहान-सेझमध्ये सर्वाधिक रोजगार देणारा प्रकल्प म्हणून पतंजलीची ओळख निर्माण झाली होती; पण ओळख हळूहळू पुसट झाली. रोजगारासाठी आतापर्यंत जवळपास पाच हजार युवकांचे अर्ज प्रलंबित असल्याची माहिती आहे. एक महिन्यापूर्वी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी ३० डिसेंबरपर्यंत पतंजलीचा प्रकल्प सुरू होईल आणि याकरिता दररोज पतंजलीच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याचे म्हटले आहे. एक महिन्यापासून पतंजलीमध्ये मोठ्या मशिनरी येत आहेत. कुलिंग प्लांटसुद्धा आला आहे. प्रकल्पाचे शेड पूर्वीपासूनच तयार आहेत. या शेडमध्ये मशीन उभारणीचे काम सुरू झाल्याची माहिती आहे. आर्थिक समस्येमुळे थांबलेले काम आता पूर्वपदावर येत आहे. आता प्रकल्प सुरू होण्यात कोणताही अडथळा नसल्याचे मत दीपक कपूर यांनी एक महिन्यापूर्वी मिहानच्या दौऱ्यादरम्यान व्यक्त केले होते.
१० सप्टेंबर २०१६ रोजी भूमिपूजन करण्यात आले तेव्हा नऊ महिन्यांतच प्रकल्पाची उभारणी आणि उत्पादन सुरू होईल, असे सांगण्यात आले होते; पण वित्तीय समस्यांमुळे प्रकल्प पाच वर्षे लांबणीवर गेला. पतंजलीला २३२ एकर जमीन सेझमध्ये आणि ३२ एकर जमीन सेझबाहेर देण्यात आली आहे. पायाभूत बांधकाम पूर्वीच झाले आहे, केवळ मशिनरीची प्रतीक्षा होती. तीसुद्धा आली आहे. ३० डिसेंबरपर्यंत उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील युवक आणि शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचा कच्चा माल पतंजली विकत घेणार आहे. त्यामुळे विदर्भात पतंजलीला हव्या असलेल्या कच्च्या मालाचे उत्पादन शेतकरी घेतील, असे सूत्रांनी सांगितले.
मिहानमधील पतंजली प्रकल्पाचे प्रमुख कुलदीप सिंग यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता होऊ शकला नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती मिळू शकली नाही. यापूर्वीही एमएडीसीने उत्पादन सुरू करण्यासंदर्भात आणि भूखंडावरील मालकी हक्क सोडण्यास नोटीस बजावण्यात आली असल्याची बाब माहितीच्या अधिकारात पुढे आली होती.
युवकांना प्रशिक्षण देणार
कपूर म्हणाले, प्रकल्पासाठी ऑक्टोबरपासून जवळपास २०० युवकांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. याकरिता कंपनीची चर्चा करण्यात येईल. यावर कंपनीनेही सहमती दर्शविली आहे. सर्व युवक विदर्भातील असतील. प्रशिक्षणानंतर त्यांना प्रकल्पात काम करण्याची संधी मिळेल.