व्हीसीएवर मॅच होऊ देणार नाही
By Admin | Updated: April 8, 2016 02:52 IST2016-04-08T02:52:07+5:302016-04-08T02:52:07+5:30
विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. अशापरिस्थितीत आयपीएलचा एकही सामना व्हीसीए जामठावर होऊ देणार नाही,

व्हीसीएवर मॅच होऊ देणार नाही
नागपूर : विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. अशापरिस्थितीत आयपीएलचा एकही सामना व्हीसीए जामठावर होऊ देणार नाही, असा इशारा जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी दिला आहे. आयपीएलच्या नवव्या सीझनला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. क्रिकेटच्या सामन्यादरम्यान प्रचंड प्रमाणात पाण्याचा वापर होतो.
संपूर्ण महाराष्ट्र सध्या दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाईने होरपळत असून गावच्या गाव ओस पडली आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच भाजपाने महाराष्ट्रात आयपीएलचे सामने खेळविण्यास विरोध केला होता. नुकतेच न्यायालयानेही माणसांना पाणी द्यावे की क्रिकेटसाठी पाणी द्यावे, असा प्रश्न केला होता. आयपीएलच्या सामने जामठा स्टेडियमवर होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या सामने बंद पाडण्याचा इशारा प्रशांत पवार यांनी दिला आहे. जामठा स्टेडियमच्या आसपासच्या गावांमध्येही लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशावेळी क्रिकेटचा सामना होऊ देणार नाही व स्टेडियमची पीच खोदून काढू, असा इशारा प्रशांत पवार यांनी दिला आहे.(प्रतिनिधी)