मिळणार नाहीत २०० बसेस
By Admin | Updated: July 1, 2014 00:57 IST2014-07-01T00:57:02+5:302014-07-01T00:57:02+5:30
नागपूर शहराला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या २०० स्टार बसेसवर संकट ओढवले आहे. केंद्रात सत्ता परिवर्तन झाले आहे. सत्ता बदलताच योजनांचे स्वरूपही बदलायला लागले आहे. जेएनएनयूआरएमअंतर्गत

मिळणार नाहीत २०० बसेस
सत्ता परिवर्तनाचा परिणाम : योजनेचे स्वरूप बदलणार
राजीव सिंग - नागपूर
नागपूर शहराला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या २०० स्टार बसेसवर संकट ओढवले आहे. केंद्रात सत्ता परिवर्तन झाले आहे. सत्ता बदलताच योजनांचे स्वरूपही बदलायला लागले आहे. जेएनएनयूआरएमअंतर्गत नवीन बसेस मिळणार होत्या. परंतु केंद्र संबंधित योजनेचे नाव व स्वरूप बदलविण्याची तयारी करीत आहे. तसेच जेएनएनयूआरएमला परिवहनापासून दूर ठेवण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत नागपूरला नवीन बसेस मिळणार नसल्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन मात्र नवीन बसेससाठी डेपो, वर्कशॉप, पार्किंग आदींसाठी जागा शोधण्याच्या कामाला लागले आहे. गेल्या वर्षी केंद्रीय नगरविकास विभागाचे सचिव नागपूर दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान त्यांनी स्टार बसेसची पाहणी केली होती. तेव्हा महापालिकेला स्टार बसेससाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याचे निर्देश दिले होते; सोबतच नवीन बसेससाठी प्रस्ताव तयार करून पाठविण्याचीही सूचना केली होती. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या कार्यकाळात नवीन बसेससाठी मूलभूत सुविधा विकसित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची (पीएमसी) नियुक्ती करण्यात आली होती. नवीन बसेसच्या संचालनासाठी नवीन नियुक्ती करण्याची तयारी सुरू झाली होती.