विदर्भात उद्योग का उभे राहू नयेत?
By Admin | Updated: February 2, 2015 01:10 IST2015-02-02T01:10:59+5:302015-02-02T01:10:59+5:30
कोकण-कोल्हापूरनंतर सर्वाधिक खनिज संपत्ती विदर्भात आहे. महाराष्ट्रात कुठेही इतकी खनिज संपत्ती नाही. टाटांनी स्टील प्लान्ट उभा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांची नजर सर्वप्रथम

विदर्भात उद्योग का उभे राहू नयेत?
केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर : ‘खनिज एक अनमोल संपत्ती’ विषयावर मार्गदर्शन
नागपूर : कोकण-कोल्हापूरनंतर सर्वाधिक खनिज संपत्ती विदर्भात आहे. महाराष्ट्रात कुठेही इतकी खनिज संपत्ती नाही. टाटांनी स्टील प्लान्ट उभा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांची नजर सर्वप्रथम गडचिरोलीवर पडली. कारण येथे मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. उद्योग उभारणीसाठी त्यांनी हत्तीवर बसून या परिसराची पाहणी केली आणि त्यांना हा प्रदेश खनिज संपत्तीच्या उपलब्धतेने आवडला. उद्योग उभारण्यात त्यांना वाहतूक व्यवस्थेची समस्या निर्माण झाली, अन्यथा टाटा स्टील प्लान्ट जमशेदपूरऐवजी गडचिरोलीत राहिला असता, हा इतिहास आहे. आज गडचिरोलीत वाहतूक, रस्ते सारेच झाले; पण विदर्भात खनिज संपत्तीवर आधारित उद्योग उभा झाला नाही, याची खंत केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केली.
‘खनिज एक अनमोल संपत्ती’ विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खनिज देशाची आणि समाजाची गरज आहे. आपल्या देशाची भूमी संपन्न आहे. पण गेल्या अनेक वर्षांत खनिजांच्या विविधतेचा आपण उपयोगच घेऊ शकलो नाही. खनिजांवर आधारित प्रोसेसिंग आणि फिनिशिंग प्लान्ट केले असते तर देशात आणि विदर्भातही बेरोजगारी राहिलीच नसती. मोदींच्या अजेंड्याप्रमाणे ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वच मंत्रालयांवर दबाव आहे. सारेच मंत्रालय अतिशय गंभीरपणे यावर काम करीत आहे. खनिज संपत्तीवर आधारित उद्योग उभारणी झाली नाही आणि जे उद्योग स्थापन झाले ते बंद पडले. येत्या काळात नव्या उद्योगांसह बंद पडलेल्या उद्योगांनाही चालू करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. कोळसा ही मोठी संपदा देशात असताना एक लाख कोटींचा कोळसा आयात करावा लागतो, हे दुर्दैवी आहे. ही स्थिती आम्ही बदलत आहोत. आपल्या देशात खनिजांचा उपयोग प्रामाणिकपणे केवळ सिमेंट निर्मितीसाठी झाला. नागपुरात आयबीएमसारखी संस्था आहे; पण त्यांचे काम चांगले नाही, हे खेदाने म्हणावे लागते. विदर्भातील खनिज बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका घ्या. येथील खनिज उपयोगात आणायचे असेल तर येथेच उद्योग उभारण्याची नीती स्वीकारा, विदर्भात उद्योग, रोजगार वाढतील, असे ते म्हणाले. याप्रसंगी आ. अनिल सोले, नवनीतसिंग तुली प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अभ्यासक मनोज तिवारी यांनीही अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)