मॉडेल स्टेशनमुळे पडेल रेल्वे मेन्स शाळेवर हातोडा ? ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:26 IST2020-12-12T04:26:14+5:302020-12-12T04:26:14+5:30
स्वातंत्र्यापूर्वी १९३३ साली मराठी भाषिक मुलांसाठी रेल्वे मेन्स शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. हळूहळू ...

मॉडेल स्टेशनमुळे पडेल रेल्वे मेन्स शाळेवर हातोडा ? ()
स्वातंत्र्यापूर्वी १९३३ साली मराठी भाषिक मुलांसाठी रेल्वे मेन्स शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. हळूहळू मुलांची संख्या वाढत गेली व हायस्कूलपर्यंतचे शिक्षण सुरू झाले. १९५२ साली १० वी पर्यंत हायस्कूलची मान्यता मिळाली. तेव्हापासून शिक्षणाचा हा प्रवास अविरत सुरू आहे. शाळेचे प्राचार्य पद्माकर तेलंग यांनी सांगितले, प्रत्येक क्षेत्रात शाळेच्या विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळविला आहे. डाॅक्टर, इंजिनिअर, मॅनेजमेंट, राजकारण ते चित्रपटापर्यंत प्रत्येक क्षेत्रात येथील विद्यार्थ्यांनी भरारी घेतली व परदेशातही आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. सीबीएसई शिक्षणाच्या काळातही शाळेने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांसह जाटतराेडी, इंदिरानगर, रामबाग, मेडिकल, छाेटी धंताेली, पार्वतीनगर, काैशल्यानगर, रमाईनगर, विश्वकर्मानगरसह अनेक भागातील रिक्षाचालकांपासून खासगी व शासकीय कर्मचाऱ्यांची मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. माॅडेल स्टेशन प्रकल्पामुळे शाळेच्या अस्तित्वावर अनिश्चितता निर्माण झाली आहे. शाळा ताेडण्याबाबत अद्याप कुठलीही सूचना आलेली नाही पण प्रकल्पाच्या प्रस्तावातून ही माहिती समाेर येत आहे. अनेक वर्ष जगविलेली शाळेतील माेठमाेठी ५४ झाडे ताेडण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. शाळेचे पुनर्वसन कुठे हाेणार याबाबतही माहिती नाही.
प्रशासनाच्या प्रकल्पाला आम्ही विराेध करू शकत नाही. मात्र शाळेबाबतची अनिश्चितता दूर हाेणे गरजेचे आहे. शिक्षण महागडे झाले असताना आसपासच्या गरीब वस्त्यांमधील शेकडाे विद्यार्थ्यांसाठी ही शाळा आधार आहे. त्यामुळे तिचे अस्तित्व कायम राहावे, ही आमची अपेक्षा आहे.
- पद्माकर तेलंग, प्राचार्य
शाळा तुटणे दुर्दैवी ()
या शाळेत १९९३ ते २००० या काळात दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेला व आता अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथे नाेकरी करीत असलेले याेगेश नेमाडे यांनी शाळेविषयी अनेक आठवणी ताज्या केल्या. शाळेशी आमच्या भावना जुळलेल्या आहेत. प्रकल्पाला विराेध नाही पण शाळेची पर्यायी व्यवस्था जवळपास करण्यात यावी. या भागात शहरात नाही एवढी हिरवळ आहे. ती नष्ट करू नये, अशी भावना याेगेश यांनी व्यक्त केली.