सरकार देईल का ‘टू मिनीट’?
By Admin | Updated: June 5, 2015 02:29 IST2015-06-05T02:29:59+5:302015-06-05T02:29:59+5:30
‘बस टू मिनीट’ ही कॅचलाईन घेऊन घराघरात पोहचलेल्या मॅगीच्या दर्जावरून देशभरात रान उठविले जात आहे.

सरकार देईल का ‘टू मिनीट’?
नागपूर : ‘बस टू मिनीट’ ही कॅचलाईन घेऊन घराघरात पोहचलेल्या मॅगीच्या दर्जावरून देशभरात रान उठविले जात आहे. मात्र, दररोज लाखो विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या दर्जाकडे मात्र सोईस्करपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मॅगी हे बहुतेक उच्च व मध्यमवर्गीयांचे खाद्य असल्यामुळे आज देशभरात त्याची चर्चा होत आहे. परंतु शालेय पोषण आहारांच्या निकृष्ट दर्जा बाबत मोठ्या प्रमाणात असणाऱ्या तक्रारीकडेही सरकार तेवढ्याच गांभीर्याने लक्ष देणार का, या आहाराच्या चौकशीसाठी सरकार ‘टू मिनीट’ देणार का,असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एक ते पाच वर्गाच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार व सहा ते आठ वर्गाच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात येते. एक ते पाचपर्यंत आहाराचे प्रमाण प्रति विद्यार्थी तांदळाचे वाटप १०० ग्रॅम, यात कॅलरी ४५० व प्रथिने १२ ग्रॅम असते. त्याचबरोबर आहार खर्च ३.५० रुपये मिळतो. माध्यमिकसाठी प्रति विद्यार्थी १५० ग्रॅम तांदूळ, कॅलरी ७००, प्रथिने २० ग्रॅम व आहार खर्च ५.२० पैसे मिळतो.
शाळांमध्ये होणारा अन्नधान्य पुरवठा दि. महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. येथून होतो. एफसीआय गोदामातून तांदळाची उचल करून, पुरवठादारामार्फत शाळांना पुरवठा केला जातो. शाळांना अन्न शिजवून देणे, इंधन व भाजीपाला याकरिता स्वतंत्र अनुदान दिले जाते. शहरी भागातील शाळांना केवळ तांदळाचा पुरवठा होतो. अन्न शिजवून देणे, इंधन, भाजीपाला यासाठी अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील शाळांना पुरवठादाराकडून तांदुळ, तुरदाळ, चना, वाटाणा, सोयाबीन तेल, कांदा, लसूण, मसाला, हळद, मीठ, जीरे, मोहरी साहित्य पुरविले जातात.
सरकार शालेय पोषण आहारावर कोट्यवधी खर्च केल्यावरही विद्यार्थ्यांना दर्जेदार आहार मिळत नाही. शाळांना होणाऱ्या तांदळाचा पुरवठा हा निकृष्ट दर्जाचा असतो. त्यात अळ्या, जाळे लागलेले असतात. चना, वाटाण्याला भिरड लागलेली असते, टोचलेले असतात. सोयाबीनचे तेल व इतरही साहित्य लोकल कंपनीचे असते. त्यामुळे त्याच्या पौष्टिकतेवर प्रश्नचिन्हच आहे. अन्नधान्याबरोबर शाळांमध्ये आहार निर्माण करण्याच्या प्रक्रियेचाही आहाराच्या पौष्टिकतेवर परिणाम होतो.
प्रयोगशाळेत तपासणीचा दावा
नागपूर जिल्ह्यात २८३३ शाळेतील ३,९४,५६३ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविण्यात येतो. यासाठी पुरविण्यात येणारे अन्नधान्य फेडरेशनच्या लॅबमध्ये प्रमाणित करण्यात येते. न्यूट्रीशन एक्स्पर्टकडून अन्नाच्या कॅलरी ठरविल्या जातात. जे साहित्य शाळेत येते त्याची तपासणी करण्यात येते. गेल्या वर्षभरात तरी, अशा कुठल्याही तक्रारी आल्या नाही. कुठल्याही विद्यार्थ्याला अन्नातून विषबाधा झाली नाही, असा दावा शालेय पोषण आहारचे अधीक्षक निलेश वाघमारे यांनी केला आहे.