राज व उद्धव ठाकरे यांना विदर्भाचा मुद्दा पटवून देऊ
By Admin | Updated: April 30, 2016 06:18 IST2016-04-30T03:06:44+5:302016-04-30T06:18:07+5:30
स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा हा शेवटी चर्चेनेच सुटणार आहे. मनसे व शिवसेनेचा याला विरोध आहे.

राज व उद्धव ठाकरे यांना विदर्भाचा मुद्दा पटवून देऊ
श्रीहरी अणे : बोलावल्यास चर्चा करण्यास तयार
नागपूर : स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा हा शेवटी चर्चेनेच सुटणार आहे. मनसे व शिवसेनेचा याला विरोध आहे. परंतु राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी आपणास बोलावले तर आपण त्यांच्याशी या विषयावर कधीही चर्चा करायला तयार आहोत. विदर्भाचा मुद्दा आपण त्यांना पटवून देऊ, असे राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विदर्भवादी संघटनांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना मनसे व शिवसेनेच्या विरोधाबाबत विचारले असता त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. तसेच नीतेश राणे यांनी मुंबईत अणे यांच्याविरोधात लावलेल्या होर्डिंगबाबत विचारणा केली असता त्यांच्याशीही आपण चर्चा करायला तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भाच्या आंदोलनात हिंसा होऊ नये, असे आमचे म्हणणे आहे. तसा आमचा प्रयत्नसुद्धा राहणार आहे. परंतु कुणी आमच्यावर हल्ला केलाच तर त्याचा प्रतिकार करण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्ली आणि अकोला येथील घटनेने ते स्पष्ट झाले असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र दिनी संयुक्त महाराष्ट्रवादींचे कार्यक्रम आणि विदर्भवाद्यांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यात काही अप्रिय घटना घडण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता अणे यांनी ही बाब स्पष्टपणे नाकारली. आपापले कार्यक्रम करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. त्यामुळे यात स्पर्धेचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप केंद्रामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर बहुमतात आहे. त्यामुळे विदर्भ राज्य निर्माण करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी विश्वसनीय पर्यायी दबाव गट निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मी केवळ लोकांच्या हिताचे प्रश्न मांडत राहणार
अॅड. श्रीहरी अणे यांना नेहमीप्रमाणे ते निवडणूक लढणार का आणि मुख्यमंत्री होणार का? असे प्रश्न विचारण्यात आले. त्याचे उत्तर त्यांनी याही वेळेस नाही असेच दिले. ते म्हणाले, हे प्रश्न मला नेहमीच विचारले जातात. विदर्भाच्या प्रश्नावर निवडणूक लढण्याची वेळ आली तर ती भूमिकाही पार पाडू. परंतु मी व्यक्तिगत निवडणूक लढणार नाही. माझी भूमिका ही राजकीय राहणार नसून ती लोकांच्या हिताचे प्रश्न विचारणारीच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.