दुसऱ्या टप्प्यात चीनची मेट्रो रेल्वे धावणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:08 IST2021-02-08T04:08:05+5:302021-02-08T04:08:05+5:30
आनंद शर्मा नागपूर : भारतीय सीमेवर चीनच्या वाढत्या कुरापतीमुळे भारतीय रेल्वेसह केंद्र सरकारच्या अन्य विभागाने चीनसोबतचे विविध करार रद्द ...

दुसऱ्या टप्प्यात चीनची मेट्रो रेल्वे धावणार काय?
आनंद शर्मा
नागपूर : भारतीय सीमेवर चीनच्या वाढत्या कुरापतीमुळे भारतीय रेल्वेसह केंद्र सरकारच्या अन्य विभागाने चीनसोबतचे विविध करार रद्द केले आहेत. त्यामुळेच नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी चीनमध्ये निर्मित मेट्रो रेल्वेचा उपयोग करणार का? असा प्रश्न लोकांत्या मनात उपस्थित झाला आहे. पुणे मेट्रोकरिता इटलीच्या कंपनीकडून मेट्रो रेल्वे घेता येते, तर भारतीय सीमेवर कुरापती करणाऱ्या चीनच्या मेट्रो रेल्वे कंपनीकडून दुसऱ्या टप्प्यासाठी मेट्रो रेल्वे विकत घेऊ नये, असे लोकांचे मत आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या मेट्रो रेल्वेच्या निर्मितीसाठी चीनच्या सीआरआरसी लोकोमोटिव्ह अॅण्ड रोलिंग स्टॉक कंपनीसोबत करार केला होता. त्याअंतर्गत सीआरआरसीच्या चीन येथील डालियान प्रकल्पातून नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता तीन कोचच्या २३ मेट्रो रेल्वेचा पुरवठा करण्यात येणार होता. सध्या १९ रेल्वे नागपुरात आल्या असून त्या ऑरेंज आणि अॅक्वा लानवर चालविण्यात येत आहेत. उर्वरित चार रेल्वे कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आणि अन्य तांत्रिक कारणांनी नागपुरात आल्या नाहीत.
पूर्वी डोकलाम वादावेळी चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी झाली होती. अशा स्थितीत सीमेवर सुरू असलेल्या वादामुळे नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी चीनकडून मेट्रो रेल्वे खरेदी करण्यात येणार काय, असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झाला होता.
निविदेनंतर स्थिती स्पष्ट होणार
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मेट्रो रेल्वे खरेदीसाठी निविदा जारी करण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्याही देशाची कंपनी भाग घेऊ शकते. चीनच्या कंपनीकडून मेट्रो रेल्वे घेण्यात येणार वा नाही, ही स्थिती निविदा प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यातील उर्वरित चार रेल्वे सीआरआरसीच्या चीन येथील डालियान प्रकल्पात तयार आहेत. या रेल्वे दोन वा तीन आठवड्यात नागपूरकडे रवाना होऊ शकतात. दुसऱ्या टप्प्याच्या डीपीआरला दोन महिन्यात मंजुरी मिळाल्यानंतरच बांधकाम सुरू होणार आहे.
- डॉ. बृजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो.