बार व दारूची दुकाने सुरू होणार का?
By Admin | Updated: April 5, 2017 02:22 IST2017-04-05T02:22:15+5:302017-04-05T02:22:15+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्ह्यातील बार आणि दारूची दुकाने ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद झाली,

बार व दारूची दुकाने सुरू होणार का?
वरिष्ठ स्तरावर हालचाली :
सर्वोच्च न्यायालयाचा अवमान
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्ह्यातील बार आणि दारूची दुकाने ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद झाली, पण ही दुकाने पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली राजकीय आणि शासकीय स्तरावर छुप्या पद्धतीने सुरू झाल्या आहेत. बंद झालेले बार आणि दुकाने पुन्हा सुरू झाल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरणार आहे. त्यावर नव्याने सुनावणी होऊन स्थिती ‘जैसे थे’ होऊ शकते, असे मत कायदेतज्ज्ञांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
१५ डिसेंबर २०१६ नंतर राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वर्गीकृत करता येणार नाही, असेही निकालात स्पष्ट केले आहे. त्यानंतरही रस्ते स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वर्गीकृत करण्यात येत आहेत. त्याचे उदाहरण म्हणजे नागपूर-काटोल-जलालखेडा राज्य महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वर्गीकृत करून १७ बार आणि दारूच्या दुकानांना फायदा मिळवून दिला आहे. अशाच प्रकारे नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुके आणि शहरातील बार व दारूची दुकाने पुन्हा सुरू करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग स्थानिक संस्थांकडे वर्गीकृत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्थात विक्रीकर संग्रहणाचे कारण पुढे करून दारू विक्रेत्यांसमोर शासन नतमस्तक झाल्याचा प्रत्यय येत आहे. बार आणि दुकाने सुरू व्हावीत, यासाठी नेते, दारू विक्रेते आणि शासकीय अधिकारी युद्धस्तरावर कार्यरत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
नागपूर जिल्ह्यात ६८० परमिट रूम आणि बारपैकी ५४३ बंद झाली असून फक्त १३७ बार सुरू आहेत. हीच स्थिती विदेशी दारूच्या दुकानांची आहे. ११५ पैकी ६४ दुकाने बंद झाली असून ५१ सुरू आहेत. देशी दारू दुकानांमध्ये २८९ पैकी १९८ बंद झाली आहे. तसेच एकूण १०२ बीअर शॉपीपैकी ६७ बंद झाली आहेत. सर्व दुकानांची आकडेवारी पाहिल्यास नागपूर जिल्ह्यात ११८६ पैकी ८७१ बार, देश व विदेशी दारूची दुकाने आणि बीअर शॉपी बंद झाल्याची अधिकृत आकडेवारी आहे. जवळपास ७० टक्के दुकाने बंद झाल्यामुळे शासनाला विक्रीकरापासून मुकावे लागेल, ही बाब खरी असली तरीही अधिकाऱ्यांची कमाई बंद होणार आहे. त्यामुळेच नेत्यांना हाताशी धरून दारू विक्रेत्यांसोबत संगनमत करून शासकीय अधिकारी दुकाने सुरू करण्याचा जोरकस प्रयत्न करीत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. यामुळे बार आणि दारुची दुकाने नव्याने खरंच सुरू होणार का, यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)