राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी बंग कायम राहणार का ?

By Admin | Updated: September 17, 2015 03:49 IST2015-09-17T03:49:04+5:302015-09-17T03:49:04+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी काही केल्या थांबताना दिसत नाही. राष्ट्रवादीच्या नागपूर शहर अध्यक्षपदी माजी मंत्री अनिल देशमुख ...

Will the band remain as the District President of NCP? | राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी बंग कायम राहणार का ?

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी बंग कायम राहणार का ?

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी काही केल्या थांबताना दिसत नाही. राष्ट्रवादीच्या नागपूर शहर अध्यक्षपदी माजी मंत्री अनिल देशमुख यांची करण्यात आलेली नियुक्ती ही हंगामी स्वरूपाची असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता जिल्हाध्यक्षपदी रमेश बंग कायम राहतील का, असा प्रश्न पक्ष वर्तुळात चर्चिला जात आहे. देशमुखांनी पद सोडले तर बंगही पद सोडतील व तेही आपल्या समर्थकाकडे जिल्ह्याची जबाबदारी देण्याची विनंती पक्षाकडे करतील, अशी चर्चा आहे. बंग यांनी मात्र यावर काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
माजी मंत्री अनिल देशमुख व रमेश बंग या दोन नेत्यांच्या गटबाजीला कंटाळून पक्षनेतृत्वाने संबंधित दोन्ही मंत्र्यांवर जबाबदारी सोपवून आता तुम्हीच एकमेकांच्या तक्रारी करण्यापेक्षा शहर व जिल्हा सांभाळा, असा संदेश दिला होता. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना पक्षवाढीसाठी लक्ष केंद्रित करावे लागणार होते. शिवाय आगामी निवडणुकांमध्ये रिझल्टही द्यायचा होता. मात्र, नियुक्तीच्या दोन दिवसानंतर अनिल देशमुख यांची शहर अध्यक्षपदी झालेली नियुक्ती ही तात्पुरती असल्याची माहिती समोर आली. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या २३ व २४ सप्टेंबर रोजी प्रस्तावित विदर्भ दौऱ्यानंतर देशमुख शहर अध्यक्षपद सोडतील व नव्या व्यक्तीला संधी दिली जाईल, असे सांगितले गेले. विशेष म्हणजे देशमुख यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.
देशमुख अध्यक्षपद सोडणार हे समजताच बंग समर्थकही सक्रिय झाले आहेत. पक्षाने दोन्ही माजी मंत्र्यांवर शहर व जिल्ह्याची जबाबदारी सोपविली होती. त्यामुळे परीक्षाच घ्यायची असेल तर दोन्ही नेत्यांची घ्यावी, देशमुख यांना जबाबदारीतून मुक्त केले जात असेल तर तोच न्याय बंग यांच्याशीही केला जावा. त्यांनाही जिल्हाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून ग्रामीणमधील नव्या दमाच्या नेत्याकडे जबाबदारी सोपवावी, असा सूर बंग समर्थकांनी लावला आहे. बंग समर्थकांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे देशमुख यांच्या संदर्भातील निर्णय घेताना पुन्हा पक्षापुढील अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, याबाबत रमेश बंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण शरद पवार यांच्या दौऱ्याच्या नियोजनात व्यस्त असल्याचे सांगत या प्रकरणावर कुठलेही भाष्य करण्यास नकार दिला.

Web Title: Will the band remain as the District President of NCP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.