पतीला जगविण्यासाठी पत्नीची धडपड

By Admin | Updated: November 5, 2014 00:54 IST2014-11-05T00:54:08+5:302014-11-05T00:54:08+5:30

पतीला ‘अ‍ॅनाकिलोजिंग स्पॉन्डेलायटिस’ हा रोग जडल्याचे निदान झाले आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. ऐन उमेदीच्या काळात आयुष्याच्या सोबतीने खाट पकडली. उदरनिर्वाहाचे साधन

Wife's struggle for survival of husband | पतीला जगविण्यासाठी पत्नीची धडपड

पतीला जगविण्यासाठी पत्नीची धडपड

१२ वर्षांपासून खाटेवर : शस्त्रक्रियेसाठी हवे मदतीचे बळ
नागपूर : पतीला ‘अ‍ॅनाकिलोजिंग स्पॉन्डेलायटिस’ हा रोग जडल्याचे निदान झाले आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. ऐन उमेदीच्या काळात आयुष्याच्या सोबतीने खाट पकडली. उदरनिर्वाहाचे साधन असलेले आलू-कांद्याचे दुकान बंद पडले. पतीला पुन्हा उभे करण्यासाठी तिने शेती विकली. उपचार केला, पण आज १२ वर्षे झालीत, पती खाटेवरच आहे. उपचारात हातचेही गेले. आता उपचार नको, मरण दे म्हणून पती विनंती करतो, भांडतो. पण तिला पराभव पत्करायचा नाही. तिला नुकतेच गोल्हर हॉस्पिटलमध्ये लंडनहून डॉ. विजय काणे अशा रुग्णांवर उपचार करतात अशी माहिती मिळाली. तिने नागपूर गाठले. डॉक्टरांनी जॉर्इंट रिप्लेसमेंटची शस्त्रक्रियेसाठी चार लाखांचा खर्च सांगितला. हा खर्च तिच्या आवाक्याबाहेरचा आहे, असे असतानाही हताश झालेल्या पतीला जगविण्याची तिची धडपड सुरू आहे.
रा. आकोट तहसील नंदीपेट जिल्हा अकोला येथील रहिवासी शोभा महादेव दिंडोकर असे त्या पत्नीचे नाव. २००२ मध्ये शोभाचे पती महादेव यांच्या अंगावर कांद्याचे पोते पडण्याचे निमित्त झाले आणि तेव्हापासून ते खाटेवरच आहे. पत्नीने त्यांना चांगल्यात चांगला उपचार मिळावा म्हणून शेती विकली. परंतु काहीच फायदा झाला नाही. छोटी मुले, त्यांचे शिक्षण, घर कसे चालावे, हा प्रश्न होता. ती हिंमत हरली नाही. कर्ज काढून दोन म्हशी घेतल्या. दुधाचा व्यवसाय सुरू केला. कोणी सांगेल त्या डॉक्टराकडून उपचार केला. परंतु कुठेच यश आले नाही. आपल्यामुळे घर आर्थिक अडचणीत आल्याचे दु:ख पतीला पहावले जात नाही. उपचार नको, मरण दे म्हणून पत्नीला विनंती करतात. यावरून अनेकवळा भांडणही झाले. नुकतेच कुणीतरी शोभा यांना नागपूरच्या गोल्हर हॉस्पिटलमध्ये वर्षातून दोन वेळा लंडनवरून डॉ. विजय काणे येतात व अशा रुग्णांवर मोफत उपचार करीत असल्याची माहिती दिली.
तिने नातेवाईकांकडून उसने पैसे घेतले आणि सोमवारी गोल्हर हॉस्पिटल गाठले. डॉ. अनिल गोल्हर यांनी पतीला तपासल्यावर चार शस्त्रक्रिया सांगितल्या. या शस्त्रक्रियेनंतर महादेव पुन्हा आपल्या पायावर उभे राहून चालू-फिरू शकतील अशी शाश्वतीही दिली. शोभा यांची आशा वाढली आहे. परंतु दारिद्र्यासमोर एवढा खर्च शक्य नसल्याने ती संकटात सापडली आहे. तिचा हा शेवटचा प्रयत्न आहे. या प्रयत्नाला समाजाचे आर्थिक पाठबळ मिळाल्यास महादेव पुन्हा स्वत:च्या पायावर उभे राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
मदतीचे आवाहन
आर्थिक स्थितीमुळे असहाय बनलेल्या शोभा यांचे पती महादेववर शस्त्रक्रियेसाठी मदतीची गरज आहे. हीच मदत तिला पुन्हा एकदा लढण्याचे बळ -जगण्याची उभारी देऊ शकते. मदत करू इच्छिणाऱ्या दात्यांनी रामदासपेठ येथील गोल्हर स्पाईन केअर अ‍ॅण्ड ट्रामा रिसर्च इन्स्टिट्यूट येथे किंवा या हॉस्पिटलच्या सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या खाते क्रमांक ३१२०६३९४७१ यावर धनादेश अथवा धनाकर्ष पाठवावेत, असे आवाहन शोभा दिंडोकार (९९२११३७१७३) यांनी केले आहे.

Web Title: Wife's struggle for survival of husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.