पत्नीचा खून, पतीचा जामीन फेटाळला
By Admin | Updated: December 6, 2015 03:14 IST2015-12-06T03:14:40+5:302015-12-06T03:14:40+5:30
अंगावर अॅसिड टाकून पत्नीचा निर्घृणपणे खून करणाऱ्या एका आरोपी पतीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.

पत्नीचा खून, पतीचा जामीन फेटाळला
मालमत्ता हडपण्यातून कृत्य : खून दडपण्याचा होता प्रयत्न
नागपूर : अंगावर अॅसिड टाकून पत्नीचा निर्घृणपणे खून करणाऱ्या एका आरोपी पतीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
मिथिलेश सुरेश बोरकर (३५), असे आरोपीचे नाव असून तो पाचपावली बारसेनगर येथील रहिवासी आहे. स्वाती बोरकर (३५), असे मृत महिलेचे नाव होते. खुनाची घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झिंगाबाई टाकळी भागातील बंधूनगर येथे घडली होती. प्रत्यक्ष ही घटना ३ आॅगस्ट २०१५ रोजी घडली होती. १७ आॅक्टोबर २०१५ रोजी मृत महिलेची आई आशा रूपलाल गणवीर (५२) यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविच्या ३०२, ४९८ (अ), ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
स्वातीच्या वडिलांची मालमत्ता हडपण्यातून मिथिलेश बोरकर हा तिचा मानसिक व शरीरिक छळ करायचा. ३ आॅगस्ट २०१५ रोजी त्याने तिच्या अंगावर अॅसिड टाकले होते. परिणामी ती ७ आॅगस्ट रोजी मेयो इस्पितळात उपचार घेताना मरण पावली होती. पोलिसांनी मिथिलेश याला अटक केल्यानंतर त्याचा सहा दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला होता. परंतु त्याने तपासात पोलिसांना कोणतेही सहकार्य केले नव्हते.
दरम्यान आरोपीने जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु प्रकरण गंभीर असल्याने आणि तो साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता असल्याने त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील पंकज तपासे यांनी बाजू मांडली.
तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक डी. एम. भेदोडकर हे आहेत.(प्रतिनिधी)