हुंड्यासाठी पत्नीचा घेतला बळी

By Admin | Updated: June 2, 2017 02:37 IST2017-06-02T02:37:44+5:302017-06-02T02:37:44+5:30

लग्नात मनासारखा हुंडा मिळाला नाही म्हणून नवऱ्याने पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले.

Wife took wife for dowry | हुंड्यासाठी पत्नीचा घेतला बळी

हुंड्यासाठी पत्नीचा घेतला बळी

नवऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या : तहसील ठाण्यात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नात मनासारखा हुंडा मिळाला नाही म्हणून नवऱ्याने पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. रोशनी तुषार शेंडे (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
भंडारा जिल्ह्यातील सिल्ली अंबाडी येथील रहिवासी असलेल्या रोशनीचा विवाह डिसेंबर २०१५ मध्ये तुषार विश्वेश्वरावर शेंडे (वय २८) याच्यासोबत झाला होता. तुषार केबल कनेक्शनचे काम करतो. तो जागनाथ बुधवारी परिसरात राहतो. वधूपित्याने लग्नाच्या वेळी रितिरिवाजाप्रमाणे सर्वकाही देणेघेणे केले. मात्र, लग्नात मनासारखा हुंडा मिळाला नसल्याचे सांगत आरोपी तुषार रोशनीचा छळ करू लागला. माहेरून हुंडा आणावा म्हणून छळत होता. हा प्रकार रोशनीने आपल्या माहेरच्यांना सांगितला होता. मात्र, हळूहळू होईल सर्व बरे, असे सांगून माहेरच्यांनी तिची समजूत काढली होती. इकडे तुषारकडून होणारा छळ वाढल्यामुळे कंटाळलेल्या रोशनीने घराजवळच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी तिचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात आढळला.

नातेवाईकांनाही धमकी
ही माहिती कळताच रोशनीचे माहेरचे नातेवाईक भंडाऱ्याहून नागपुरात आले. रोशनीने तुषारच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा त्यांनी आरोप लावला. रोशनीचे वडील आनंदराव मुरलीधर पालांदूरकर यांनी तशी तक्रार तहसील ठाण्यात नोंदवली. आरोपी तुषारने रोशनीचा बळी घेतानाच आपल्याला, पत्नीला आणि मुलीला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद केले. पालांदूरकर यांच्या तक्रारीवरून तहसीलचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. कडलग यांनी आरोपी तुषारविरुद्ध हुंडाबळी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपीला अटक झालेली नव्हती.

Web Title: Wife took wife for dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.