अपघातात पत्नी ठार, पती गंभीर जखमी
By Admin | Updated: July 15, 2015 03:25 IST2015-07-15T03:25:04+5:302015-07-15T03:25:04+5:30
भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर महिलेचा पती गंभीर जखमी झाला.

अपघातात पत्नी ठार, पती गंभीर जखमी
भरधाव कारची दुचाकीला धडक : बाजारगाव शिवारातील घटना
बाजारगाव : भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर महिलेचा पती गंभीर जखमी झाला. ही घटना बाजारगाव शिवारातील फन अॅण्ड फूड फाटा परिसरात मंगळवारी सांयकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. लता प्रवीण मसराम (२८, रा. कैलासनगर, नागपूर) असे मृत महिलेचे नाव आहे तर प्रवीण मन्साराम मसराम असे गंभीर जखमीचे नाव आहे.डिगडोह (पांडे) या सासूरवाडीवरून मसराम दाम्पत्य आपल्या एमएच-४९/पी-७४५२ क्रमांकाच्या दुचाकीने नागपूरकडे येत होते. दरम्यान, नागपूर-अमरावती महामार्गावरील फन अॅण्ड फूड फाटा परिसरातील वळणमार्गावर अमरावतीहून नागपूरकडे येणाऱ्या एमएच-१३/एझेड-७५८८ क्रमांकाच्या भरधाव कारने मसराम यांच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली. यात दुचाकीवरील पती-पत्नी गंभीररीत्या जखमी झाले. जखमींना नागपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे लता मसराम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेले प्रवीण मसराम यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी आरोपी कारचालक प्रवीण जन्नू (३२, रा. सेमिनरी हिल्स, नागपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार पितांबर जाधव करीत आहेत. (वार्ताहर)