पत्नी आणि प्रियकरानेच जाळले!

By Admin | Updated: May 20, 2014 01:05 IST2014-05-20T01:05:50+5:302014-05-20T01:05:50+5:30

सर्वत्र खळबळ उडवून देणार्‍या कवलेवाडा येथील दलित व्यक्तीला ज्वलनशील पदार्थ टाकून जिवंत पेटविल्याच्या प्रकरणाने नवीन वळण घेतले. हा प्रकार दलितावरील

Wife and lover burnt! | पत्नी आणि प्रियकरानेच जाळले!

पत्नी आणि प्रियकरानेच जाळले!

 प्रकरणाला वळण : गावकर्‍यांनी जाळल्याचा केवळ होता संशय

गोंदिया : सर्वत्र खळबळ उडवून देणार्‍या कवलेवाडा येथील दलित व्यक्तीला ज्वलनशील पदार्थ टाकून जिवंत पेटविल्याच्या प्रकरणाने नवीन वळण घेतले. हा प्रकार दलितावरील अत्याचाराचा प्रकार नसून जखमी इसमाची पत्नी आणि तिच्या प्रियकरानेच हे कृत्य केल्याचे सोमवारी सायंकाळी पोलिसांनी स्पष्ट केले. जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी सायंकाळी ७.३० वाजता याबाबतचा खुलासा करताना जळाल्याने गंभीर असलेल्या संजय खोब्रागडे (५२) यांची पत्नी देवकाबाई (४५) आणि तिचा प्रियकर राजू गडपायले (४१) यांनीच हे कृत्य केल्याचे सांगितले. संशयावरून रविवारी राजू गडपायले याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याने चौकशीदरम्यान या कृत्याची कबुली दिली. त्यानंतर सोमवारी देवकाबाईला नागपूर येथून सायंकाळी गोंदियात आणण्यात आले. दोघांनाही अटक करण्यात आली.विशेष म्हणजे गावातील ज्या सहा आरोपींची नावे जखमी संजय खोब्रागडेने घेतली होती, ती केवळ संशयातून घेतली होती. प्रत्यक्ष त्यापैकी कोणालाही त्यांनी पाहिले नव्हते. पोलिसांनी याबाबतची पडताळणी केली असता त्यापैकी काही लोक त्या दिवशी गावातच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी दुसर्‍या दिशेने तपास सुरू केला आणि हा प्रकार समोर आला. पोलीस अधीक्षक झळके यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ गिºहे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक जयेश भांडारकर व त्यांच्या चमूने अहोरात्र परिश्रम घेतल्याने या संवेदनशील प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले.दरम्यान, राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल. थूल आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी कवलेवाड्यात येऊन घटनास्थळ असलेल्या खोब्रागडे यांच्या घरी आणि ज्या जागेवरून वाद उद्भवला होता त्या जागेची पाहणी केली. त्यानंतर बाह्याबाबा मठाच्या प्रांगणात गावकर्‍यांशी चर्चा केली. यावेळी गावकर्‍यांनी आपली बाजू मांडताना गावातील वातावरण या प्रकरणामुळे कसे कलुषित होत आहे, हे सांगून या प्रकरणाला जातीयवादी रंग देऊ नये आणि खर्‍या आरोपींना हुडकून काढावे, अशी विनंती केली. यानंतर थूल व राऊत यांनी गोंदियातील सुभाष उद्यानात जमलेल्या कवलेवाडा आणि परिसरातील नागरिक तसेच दलित संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी भेट घेतली. परंतु वेळेअभावी त्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी तेथून काढता पाय घेतल्यामुळे दलित संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Wife and lover burnt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.