पत्नी अन् मुलीने घेतली याकूबची भेट

By Admin | Updated: July 24, 2015 02:44 IST2015-07-24T02:44:00+5:302015-07-24T02:44:00+5:30

मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याची पत्नी रहिना, मुलगी जुबेदा आणि अन्य तीन नातेवाईकांनी गुरुवारी येथील मध्यवर्ती कारागृहात त्याची भेट घेतली.

The wife and the daughter took the gift of Yakub | पत्नी अन् मुलीने घेतली याकूबची भेट

पत्नी अन् मुलीने घेतली याकूबची भेट

अन्य तीन नातेवाईकही सोबत : एकमेकांना दिला दिलासा
नागपूर : मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याची पत्नी रहिना, मुलगी जुबेदा आणि अन्य तीन नातेवाईकांनी गुरुवारी येथील मध्यवर्ती कारागृहात त्याची भेट घेतली. भेटीपूर्वीचा अर्धा तास आणि नंतर भेटीचा अर्धा तास असे सुमारे एक तास ही मंडळी कारागृहाच्या आतल्या भागात होती.
याकूबचा डेथ वॉरंट निघाल्याचे जाहीर झाल्यापासून कारागृहात त्याची भेट घेण्यासाठी नातेवाईक आणि वकिलांची धावपळ वाढली आहे. सोमवारी याकूबचा भाऊ उस्मान आणि वकील अ‍ॅड. अनिल गेडाम या दोघांनी तर, मंगळवारी या दोघांसह दिल्लीतील वकील अ‍ॅड. शुबेल फारूख यांनीही याकूबची भेट घेतली. मंगळवारी याकूबची क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने खारीज केली. याच दिवशी त्याने कारागृह प्रशासनाकडे राज्यपालांना पाठविण्यासाठी दयेचा अर्ज दिला.
या सर्व घडामोडी सुरू असतानाच बुधवारी रात्री याकूबची पत्नी, मुलगी आणि अन्य तीन नातेवाईकांसह मुंबईहून दुरंतो एक्स्प्रेसने नागपूरला येण्यासाठी निघाली. गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास ही मंडळी नागपूर रेल्वेस्थानकावर पोहचली. तेथून ते एका इनोव्हा कारने कारागृह परिसरात आले.
कारागृह प्रशासनाकडे भेटीच्या प्रक्रियेची पूर्तता आधीच करून ठेवण्यात आली होती. त्यामुळे याकूबची पत्नी रहिना, मुलगी जुबेदा, मेव्हणी रिजवाना अकबर कारवाला, राहिल आणि मोहम्मद सुहेल मोहम्मद याकूब या पाच जणांना लगेच व्हिजिटर रूममध्ये नेण्यात आले.
सकाळी ९.३० ते १०.४५ पर्यंत त्यांनी याकूबची भेट घेतली. त्यानंतर नातेवाईकांसह याकूबची पत्नी डोळे पुसतच व्हिजिटर रुमच्या बाहेर निघाली. सज्ज असलेल्या पोलिसांच्या गराड्यात त्यांच्या ड्रायव्हरने एक पांढरी मांझा कार व्हिजिटर रूमजवळ आणली आणि त्यांना बसवून सुसाट वेगात ही मंडळी कारागृहापासून दूर निघून गेली.(प्रतिनिधी)
ही भेट अखेरची ?
याकूबची मुलगी जुबेदा आज त्याला कारागृहात भेटली. विशेष म्हणजे, याकूबची पत्नी रहिना कारागृहात असतानाच जुबेदा गर्भात होती. सूत्रांच्या माहितीनुसार ती आता १८ वर्षांची आहे. पित्याला भेटताना ती कमालीची सैरभैर झाली होती. याकूबही तिला पाहून अधिकच भावुक झाला होता, याकूब, जुबेदा आणि रहिना असे तिघेही बराच वेळ केवळ अश्रू ढाळत होते. त्यानंतर भेटीची वेळ संपत आल्याची त्यांना पहिल्यांदा जेव्हा सूचना करण्यात आली तेव्हा त्यांनी एकमेकांची वास्तपूस्त करून एकमेकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. दरम्यान, याकूबच्या नातेवाईकांनी घेतलेली त्याची ही भेट अखेरची ठरते की काय, अशी चर्चा कारागृह परिसरात काही जण करीत होते.
पत्रकारांना गुंगारा
याकूबच्या नातेवाईकांशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची चर्चा होऊ नये म्हणून कारागृह आणि पोलीस प्रशासनाने कमालीची खबरदारी घेतली. यापूर्वी कारागृहात भेटीला येणाऱ्यांना डीआयजीच्या कार्यालयासमोरच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आणले जात होते. गुरुवारी मात्र याकूबची पत्नी, मुलगी आणि अन्य नातेवाईकांचे वाहन पोलिसांनी कारागृहाच्या दक्षिण भागाकडून (कार वॉश सेंटर जवळ) मैदानाकडे आत घ्यायला लावले. तेथूनच ही मंडळी व्हिजिटर रूममध्ये पोहचली अन् नंतर तेथूनच ती परतही गेली. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उत्तरेकडे उभे होते. त्यांची यामुळे मोठी धावपळ झाली.

Web Title: The wife and the daughter took the gift of Yakub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.