मुक्या प्राण्याची वेडी माया!
By Admin | Updated: December 6, 2015 03:27 IST2015-12-06T03:27:08+5:302015-12-06T03:27:08+5:30
चित्रपट, मालिकांमधून मुक्या प्राण्यांचे मालकांवरील प्रेम दाखविण्यात येते. इतिहासाची पाने चाळली तर अशी अनेक उदाहरणे आहेत की,...

मुक्या प्राण्याची वेडी माया!
माकडाला मित्राची प्रतीक्षा : ठाण्याच्या आवारात ठिय्या
गणेश खवसे नागपूर
चित्रपट, मालिकांमधून मुक्या प्राण्यांचे मालकांवरील प्रेम दाखविण्यात येते. इतिहासाची पाने चाळली तर अशी अनेक उदाहरणे आहेत की, मालकासाठी वेळप्रसंगी मुक्या प्राण्याने जीवही दिला. घोडा असो की कुत्रा, अगदी घरातील पाळीव मांजर किंवा कबुतर... ‘ते’ मनुष्याच्या मदतीला धावले. ज्याने ‘मुक्या’ प्राण्याशी जीव लावला, त्या मालकाच्या मृत्यूनंतर मात्र हे मुके जीव कासावीस होते. त्यांच्या नैसर्गिक स्वभावात फरक पडतो. अशीच एक घटना गिट्टीखदानमध्ये उघडकीस आली आहे. आपल्याला प्रेम करणाऱ्याचा मृत्यू झाल्याचे ‘ते‘माकड मानायला तयार नाही. त्यामुळे तब्बल ३० तासांपासून ते पोलीस ठाण्याच्या आवारातच घुटमळत आहे. या घटनेतून पुन्हा एकदा मुक्या जीवांच्या मायेचा प्रत्यय आला आहे.
शुक्रवारी सकाळच्या सुमारास गिट्टीखदान पोलिसांना निनावी फोनद्वारे माहिती मिळाली की, कळमेश्वर मार्गावरील जुनापाणी शिवारात एक माकड विहिरीजवळ नुसते ओरडत आहे. ते अस्वस्थपणे इकडून तिकडे चकरा मारते. कुणालाच विहिरीजवळ जाऊ देत नाही. त्यामुळे नेमके घडले काय, ते कळायला मार्ग नाही. पोलिसांना हे कळताच गिट्टीखदान पोलिसांचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. विहिरीजवळ माकड होते. आतापर्यंत कुणाला जवळ येऊ न देणारे ते माकड पोलिसांना पाहून धावतच जवळ आले. नंतर त्यांच्या पुढे पुढे विहिरीजवळ पोहचले. पोलिसांनी विहिरीत डोकावले. पाहतात तर पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह होता. पोलिसांनी तो बाहेर काढला आणि तो रुग्णालयाकडे रवाना करण्यासाठी वाहनात टाकला. ते पाहताच माकडानेही पोलिसांच्या वाहनात उडी घेतली. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात रवाना केला अन् पोलीस गिट्टीखदान ठाण्यात पोहोचले. माकडही सोबतच होते. त्याला ‘मालक‘ ठाण्यात येईल, अशी आशा आहे. त्यामुळे ते गेल्या ३०-३२ तासांपासून ठाण्यातच ठिय्या देऊन आहे.
दिवसभर पोलीस ठाण्यात वर्दळ असते. ते माकड माणसाळलेले असल्याने कुणालाही त्याने त्रास दिला नाही. मात्र, ठाण्यातून रुग्णालयात गेलेल्या आणि नंतर पुन्हा ठाण्यात पोहचलेल्या पोलिसांना ते ओळखते. यामुळे ते त्याच्या मांडीवर उडी मारून बसते. जणू त्याला आपला मालक कुठे आहे, अशी विचारणा करते.
त्याच्या अस्वस्थतेने पोलीसही अस्वस्थ
मालकाच्या मृत्यूनंतर या मुक्या जीवाची झालेली अवस्था कर्तव्यकठोर पोलिसांनाही अस्वस्थ करणारी ठरली आहे. याला आता कसे सांभाळायचे, असा प्रश्न असल्यामुळे पोलिसांनी शनिवारी रात्री या मुक्या जीवाला एका वन्यप्रेमीच्या हवाली केले.
‘त्याची’ही नाही पटली ओळख
जुनापाणी शिवार कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. मात्र, या प्रकाराची माहिती मिळाल्याने घटनास्थळी पोहचलेल्या गिट्टीखदान पोलिसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. त्यानंतर प्रकरण कळमेश्वर पोलिसांकडे सोपविले. मृत कोण कुठला, ते अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस सांगतात.