लोकमत न्यूज नेटवर्ककाटोल : काटोल नगर परिषदेच्या व्यापारी संकुलाचे काही वर्षांपूर्वी 'राजे शिवछत्रपती' नगर परिषद व्यापारी संकुल असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर झाला होता. या ठरावानुसार संकुलावर तसा फलकही लावण्यात आला. मात्र दोन दिवसांपूर्वी शिवजयंतीच्या तोंडावर हा फलक हटविण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
२०१३ काटोल येथे पोलिस स्टेशनच्या बाजूला नगर परिषद प्रशासनाने व्यापारी संकुलाचे बांधकाम केले. या वास्तूला कुठलेही नाव नसल्याने स्थानिक जानता राजा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला निवेदन देत या संकुलाला 'राजे शिवछत्रपती नगर परिषद व्यापारी संकुल' असे नाव देण्याची विनंती केली होती. या निवेदनावर नगर परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत याबाबतचा ठरावही मंजूर करण्यात आला होता.
यानंतर प्रतिष्ठानच्या वतीने निधी गोळा करीत नगर परिषद संकुलावर उपरोक्त नावाचा ३० बाय ४ फुट लांब असा डिजिटल बोर्डही (फलक) लावला होता. तसेच २५ फुट उंच असा शिवध्वज उभारण्यात आला होता. गेली ८ ते ९ वर्षे या डिजिटल बोर्डवर कुणाचा आक्षेपही नव्हता.
हे अचानक कसे?मात्र अचानक हा बोर्ड हटविण्यात आल्याने यामागे राजकारण असल्याची चर्चा काटोल शहरात आहे. जानता राजा प्रतिष्ठानच्या वतीने या कृतीचा निषेध करण्यात आला आहे. तसेच हटविण्यात आलेला फलक पूर्ववत लावण्याची मागणी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मिलिंद देशमुख यांच्यासह आशिष राऊत, तिलक क्षीरसागर, बिट्ट ढवळे, हैदर अली, चेतन गुडधे आदींनी केली आहे.
"जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने पालिकेत झालेल्या ठरावानुसार 'राजे शिवछत्रपती नगर परिषद व्यापारी संकुल, काटोल' असा फलक प्रशासनाच्या मान्यतेनुसारच लावला होता. याचा खर्चही आम्हीच केला होता. आता यात नावात बदल करून नवीन बोर्ड लावण्याचे औचित्य काय, हे समजले नाही. यात निश्चितच काही कारस्थान आहे."- मिलिंद देशमुख, अध्यक्ष, जानता राजा प्रतिष्ठान
"राजे शिव छत्रपती' या नावाने पूर्वीचा बोर्ड लावण्यात आलेले होता. परंतु व्यापारी संकुलातील गाळेधारकांच्या विनंती अर्जावरून 'छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल' असा नवीन नावाचा बोर्ड लावण्यात येणार आहे." - धनंजय बोरिकर, मुख्याधिकारी काटोल