संजीव मेश्राम यांच्यावरील हल्लेखारांवर कारवाई का नाही?

By Admin | Updated: November 10, 2016 03:05 IST2016-11-10T03:05:06+5:302016-11-10T03:05:06+5:30

शांतिनगर येथे राहणारे डॉ. संजीव मेश्राम यांच्यावर लैंगिक शोषणाच्या प्रकरणात पोलिसांकडून झालेली कारवाई

Why not take action against the attackers on Sanjeev Meshram? | संजीव मेश्राम यांच्यावरील हल्लेखारांवर कारवाई का नाही?

संजीव मेश्राम यांच्यावरील हल्लेखारांवर कारवाई का नाही?

निमा संघटनेचा सवाल : खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप
नागपूर : शांतिनगर येथे राहणारे डॉ. संजीव मेश्राम यांच्यावर लैंगिक शोषणाच्या प्रकरणात पोलिसांकडून झालेली कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या संघटनेने केला आहे. या प्रकरणात डॉ. मेश्राम यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. याबाबत तक्रार देऊनही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप या संघटनेने केला आहे.
डॉ. संजीव मेश्राम यांच्यावर त्यांच्याच क्लिनीकच्या परिसरातील जीममध्ये काम करीत असलेल्या एका मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना अटक करून पोलिसांनी कारवाई केली. मात्र घटनेची कुठलीही चौकशी न करता पोलिसांनी ही कारवाई केल्याचा आरोप निमा संघटनेचे डॉ. रवींद्र बोथरा यांनी पत्रपरिषदेत केला. १० आॅक्टोबरला ही घटना घडल्याचे सांगत १८ आॅक्टोबरला ही तक्रार दाखल करण्यात आली. प्रत्यक्षात संबंधित मुलगी रुग्णालयाच्या परिसरात एका मुलाशी गैरवर्तन करताना आढळल्याने डॉ. मेश्राम यांनी तिच्यावर रागावून कामावरून काढले होते. याचा बदला घेण्यासाठी १८ आॅक्टोबरला संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी व काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून डॉ. मेश्राम यांच्यावर घरी असताना हल्ला केला होता. कुटुंबीय आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना वाचविण्यात आले व पोलिसांना सूचना देण्यात आली. मात्र तेथे आलेल्या पोलिसांनी उलट डॉ. मेश्राम यांच्यावरच गुन्हा दाखल केल्याचा आरोप डॉ. बोथरा यांनी केला. पोलिसांनी डॉ. मेश्राम यांना अटक करून ताबडतोब कारवाई केली. मात्र त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर तक्रार देऊनही कुठलीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप निमा संघटनेने केला आहे. डॉ. मेश्राम यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात यावी आणि लैंगिक शोषणाच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निमा संघटनेने केली आहे. पत्रपरिषदेला डॉ. जगमोहन राठी, डॉ. श्रीकांत वणीकर, डॉ. मोहन येंडे, डॉ. मेश्राम, डॉ. फाये, डॉ. गंभीर, डॉ. अजय मसाने, डॉ. अनिल पावशेकर, डॉ. प्रदीप पाटील व निमाचे अन्य सदस्य उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Why not take action against the attackers on Sanjeev Meshram?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.