व्यवहारेंवर गुन्हा दाखल का नाही?
By Admin | Updated: November 21, 2015 03:06 IST2015-11-21T03:06:50+5:302015-11-21T03:06:50+5:30
मेडिकलच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांच्या छळाला कंटाळून पदव्युत्तर विद्यार्थ्याने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, ...

व्यवहारेंवर गुन्हा दाखल का नाही?
विद्यार्थ्यांच्या तक्रारी पोलिसांकडे सुपूर्द : अधिष्ठात्यांनी बजावली कारणे दाखवा नोटीस
नागपूर : मेडिकलच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांच्या छळाला कंटाळून पदव्युत्तर विद्यार्थ्याने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, एका विद्यार्थिनीने त्यांच्याविरोधात केलेल्या लैंगिक छळाची तक्रार व पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या तक्रारी मेडिकल प्रशासनाने शुक्रवारी अजनी पोलीस ठाण्याकडे पाठविल्या, असे असतानाही रात्री उशिरापर्यंत व्यवहारेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. डॉ. व्यवहारेविरुद्ध पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून मेडिकलच्या चौकशी समितीच्या अहवालावरून गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
डॉ. व्यवहारे यांच्या जाचाला कंटाळून त्यांच्याच विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. नितीन शरणागतने मंगळवारी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे बयान दिले. आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी डॉ. शरणागत यांनी लिहिलेल्या पत्रात डॉ. व्यवहारे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप लावले आहे. पत्रात, या विद्यार्थ्यांने डॉ. व्यवहारे हे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नातेवाईक आहेत. मंत्र्याच्या नावाने ते वारंवार धमकावत असून जीवे मारण्यासह भविष्य खराब करून देण्याची धमकी देत असल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांचेच अधिष्ठात्यांना पत्र
नागपूर : डॉ. शरणागत यांनी पोलिसांना दिलेल्या बयानात डॉ. व्यवहारे देत असलेल्या मानसिक त्रासामुळेच आत्महत्या करण्याच्या उद्देशाने झोपेच्या १८ गोळ्या सेवन केल्याचे म्हटले आहे. असे असतानाही डॉ. व्यवहारेंच्या विरुद्ध एन.सी.क्र.२२७१/१५ कलम ५०४, ५०६ नोंद करण्यात आली आहे. अजनी पोलिसांनी शुक्रवारी अधिष्ठात्यांना दिलेल्या पत्रात डॉ. व्यवहारे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे असून ते मेडिकलच्या प्रशासकीय बाबीशी निगडीत आहेत. तरी याबाबत सखोल चौकशी करून त्यातून जर फौजदारी गुन्हा निष्पन्न झाल्यास तर याबाबत पोलीस ठाण्यास कळवावे असे म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीला घेऊन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी बुधवारी तातडीची कॉलेज कौन्सिल बोलवित डॉ. व्यवहारेंना उपअधिष्ठाता पदावर काढून टाकले.
२४ तासांच्या आत अभिप्रायही मागितला. परंतु डॉ. व्यवहारे यांनी, माझे चारित्र्य मलीन करण्याचा हा प्रयत्न आहे, असा एका ओळीचा अभिप्राय दिल्याने शुक्रवारी डॉ. व्यवहारेंना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या शिवाय तीन सदस्यीय समिती स्थापन करून २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या समितीत शरीररचनाशास्त्र विभागाचे डॉ. फूल पाटील, पीएसएम विभागाचे डॉ. प्रकाश भातकुले तर पॅथालॉजी विभागाचे डॉ. राऊत यांचा सहभाग आहे. त्यांच्या कार्यात अडथळा येऊ नये यासाठी अधिष्ठात्यांनी एक वेगळी खोली आणि क्लार्क मदतीसाठी दिले आहेत.(प्रतिनिधी)
शनिवारी ठरवू आंदोलनाची भूमिका
डॉ. व्यवहारेंवर कारवाई करण्यासाठी ४८ तासांचा अल्टीमेटम शनिवारी दुपारी ४ वाजता संपणार आहे. त्यापूर्वी पर्यंत डॉ. व्यवहारेंवर कारवाई न झाल्यास आंदोलनाची भूमिका ठरवू, अशी प्रतिक्रिया सेंट्रल मार्डचे सचिव डॉ. आयुध मकदुम आणि स्टुडन्ट कौन्सिल मेडिकल कॉलेजचे स्टुडन्ट वेलफेअर अध्यक्ष मंगेश बन्सोड यांनी दिली.