नो एक्सचेंज कशासाठी ?
By Admin | Updated: October 11, 2014 02:49 IST2014-10-11T02:49:53+5:302014-10-11T02:49:53+5:30
एकदा वस्तू खरेदी केल्यावर ती परत घेतली जाणार नाही, असा फलक लावणे किंवा देयकावरही (बिल) तसे लिहिणे बेकायदेशीर आहे, ....

नो एक्सचेंज कशासाठी ?
नागपूर : एकदा वस्तू खरेदी केल्यावर ती परत घेतली जाणार नाही, असा फलक लावणे किंवा देयकावरही (बिल) तसे लिहिणे बेकायदेशीर आहे, अशा शासनाच्या स्पष्ट सूचना असतानाही याचा प्रसार आणि प्रचार न झाल्याने ग्राहकांची लुबाडणूक सुरूच आहे. दिवाळी खरेदी हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही बाब जागरूक ग्राहकांनी निदर्शनास आणून दिली आहे.
कुठलीही वस्तू किंवा तत्सम माल खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना दुकानात ‘ एकदा खरेदी केलेला माल परत घेतला जाणार नाही’ असे लिहिलेले फलक टांगलेले दिसतात. अनेक मॉल्स, शोरूम्समध्येही ते आढळतात. व्यापारी त्यांच्या देयकावरही ही बाब प्रकर्षाने प्रसिद्ध करतात. यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याने १८ आॅगस्ट २००१ ला एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार ग्राहक संरक्षण कायदा १९८६ मधील तरतुदीनुसार दोषयुक्त वस्तू किंवा सेवेतील उणिवा, अधिक पैसे घेणे आदीसाठी ग्राहकाला व्यापाऱ्यांविरुद्ध दाद मागता येते. अशा वेळी ग्राहक मंच सदर वस्तू दुरुस्त किंवा बदल करून देण्यास संबंधितांना सांगू शकतो. विकसित देशात वस्तू खरेदी केल्यावर ग्राहक समाधानी नसेल तर ती बदलून देण्याची किंवा पैसे परत करण्याची हमी देण्यात येते. महाराष्ट्रात मात्र एकदा विकलेला माल परत घेणार नाही, अशी अट व्यापाऱ्यांकडून टाकली जाते. अशी अट टाकणे नियमानुसार बेकायदेशीर आणि ग्राहक हिताविरुद्ध आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांच्या देयकावर ‘विकलेला माल परत घेतला जाणार नाही’ अशी अट टाकू नये, असे शासनाच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)