घर घेता का घर.... बॅरि. मोहम्मद अली जिना यांचे घर विकणे आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2022 08:00 IST2022-12-03T08:00:00+5:302022-12-03T08:00:01+5:30

Nagpur News पाकिस्तानच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे बॅरि. मोहम्मद अली जिना यांचे पनेली मोटी (जि. राजकोट) येथील घर विकायला काढले आहे.

Why do you take a house, a house....Barry. Mohammad Ali Jinnah's house is for sale! | घर घेता का घर.... बॅरि. मोहम्मद अली जिना यांचे घर विकणे आहे!

घर घेता का घर.... बॅरि. मोहम्मद अली जिना यांचे घर विकणे आहे!

ठळक मुद्देवर्षभरापासून खरेदीदार येईना वास्तव्यास असलेले पोकिया कुटुंब ‘व्हिजिटर्स’ने त्रस्त

कमलेश वानखेडे/ नंदकिशोर पुरोहित

पनेली मोटी (राजकोट) : पाकिस्तानच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे बॅरि. मोहम्मद अली जिना यांचे पनेली मोटी (जि. राजकोट) येथील घर विकायला काढले आहे. येथे तीन पिढ्यांपासून राहणारे पोकिया कुटुंब या घराला भेट देण्यासाठी येणाऱ्या ‘व्हिजिटर्स’ने त्रस्त झाले आहे. त्यांना हे घर विकून गावात मोक्याच्या जागी नवे घर बांधायचे आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून एकही खरेदीदार मिळाला नसल्याने पोकिया कुटुंब नाराज आहे.

राजकोट जिल्ह्यातील उपलेटा तालुक्यात पनेली मोटी हे सुमारे १८ हजार लोकसंख्येचे गाव. या गावातील आझाद चौकात असलेल्या एका जुन्या घरी बॅरि. मोहम्मद अली जिना यांचा जन्म झाला. कुटुंबीयांसह याच घरी ते राहिले. फाळणीनंतर जिना यांचे कुटुंबीय पाकिस्तानात निघून गेले व पोकिया कुटुंबाला या घराची मालकी मिळाली. ‘लोकमत’ प्रतिनिधीने या घराला भेट दिली. सध्या नंदुबेन पोकिया यांच्या नावाने हे घर असून मालकीची कागदपत्रेही त्यांच्याच नावाने आहेत. नंदुबेन या दोन मुले, दोन सुना व नातवंडे अशा नऊ जणांच्या कुटुंबीयांसह येथे राहतात. काही दिवसांपूर्वीच मोठा मुलगा, पत्नी व मुलांसह येथून दुसरीकडे राहायला गेला. सध्या या घरात नंदुबेन यांच्यासह त्यांचा मुलगा प्रवीणभाई, पत्नी शोभा व दोन मुले असे पाच जण राहतात.

‘लोकमत’ची चमू घरी पोहचली तेव्हा शोभा पोकिया (सून) या भाजी निवडत होत्या. पती प्रवीणभाई शेतावर कामासाठी गेले होते. शोभाताई म्हणाल्या, जिनांचे हे घर तीन पिढ्यांपासून आमच्या मालकीचे आहे. दररोज देशभरातून कुणी ना कुणी हे घर पाहायला येतात. त्यामुळे आमची कामे खोळंबतात. दुपारी घटकाभर झोप घ्यायला गेले की कुणी ना कुणी बाहेरच्या दाराची कडी वाजवतो. आलेल्या प्रत्येकाला सर्व माहिती द्यावी लागते. आता आमच्या दोन्ही मुली मोठ्या झाल्या आहेत. त्यांचे शिक्षण व पुढे लग्न करायचे आहे. त्यामुळे हे जुने घर विकून गावातच मोक्याच्या ठिकाणी दुसरे घर बांधायचे आहे. गेल्या वर्षभरापासून आम्ही हे घर विकायला काढले. मात्र, कुणीच खरीददार मिळत नही. घराची किंमत विचारली असता ‘वो इनको पता है’ असे सांगत किंमत गुलदस्त्यातच ठेवली.

२२ वर्षांत पाकिस्तानहून कुणीच आले नाही!

- शोभाताई म्हणाल्या, माझ्या लग्नाला २२ वर्षे झाली. या काळात पाकिस्तानातून कुणीच जिनांचे हे घर पाहायला आल्याचे आठवत नाही. हिंदुस्तानमधून मात्र बरेच लोक येतात. कुतुहलाने घर पाहतात. फोटोही काढतात. जिनांचे घर येथे कुणी विकत घेत नसल्यामुळे पाकिस्तानातून कुणी खरेदीसाठी आले तर त्यांना विकू, असेही त्या नाराजीतून म्हणाल्या.

अधिकारी घर पाहून गेले; पण पुढे काहीच नाही

- शोभाताई म्हणाल्या, एक- दोन वेळा येथील अधिकारी आले. मोजणी केली. फोटो काढले. घर पाहून गेले; पण पुन्हा काही परतले नाही. प्रशासनातील कुणी अधिकारी येईल व या घराचा सोक्षमोक्ष लावतील, या आशेवर त्या वाट पाहत आहेत.

Web Title: Why do you take a house, a house....Barry. Mohammad Ali Jinnah's house is for sale!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :historyइतिहास