नागपूर : दोन व्यक्तींकडून १६० जागांची हमी देण्यात आली होती या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार हे जबाबदार नागरिक आहेत. जर अशा प्रकारे त्यांच्याकडे कुणी आले होते तर त्यांनी पोलिस किंवा निवडणूक आयोगाकडे लगेच तक्रार का केली नाही, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, निवडणुकीला इतके दिवस झाल्यावर असे दावे करणे यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कुणी फसवणुकीचा प्रयत्न करीत असेल तर त्यांनी पोलिसांना कळवायला हवे होते. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन हॅक करण्याचे चार वेळा सर्व राजकीय पक्ष आणि हॅकर्स यांना खुले आव्हान दिले आहे.
मात्र, कुणीही आयोगाला सामोरे जायला तयार नाहीत. आयोग त्यांना पत्र देत आहे, नोटीस देत आहे, अगदी जाहीर निमंत्रणदेखील देत आहे. मात्र, तिथे जाऊन विरोधक बोलत नाहीत. कारण 'शूट अँड स्कूट' म्हणजेच गोळ्या डागा आणि पळून जा ही त्यांची रणनीती यांची आहे, असा आरोप फडणवीस यांनी लावला.
ती दोन माणसं कोण, नावं जाहीर करा : आंबेडकर
राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याकडे कोण येतो, कोण जाते याची नोंद ठेवली जाते. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार दोघांना घेऊन गेले, त्यांची एन्ट्री राहुल गांधींच्या घरी असणार आहे. पवारांसोबत दोन माणसे कोण होती, त्यांची नावे राहुल गांधींनी जाहीर करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले.
वरातीमागे घोडं, अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परिस्थिती आहे. ईव्हीएमसंदर्भात कोर्टात जाण्यासाठी आपण यापूर्वी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी कोणीही आमच्यासोबत आले नाही. आता बोंबलत बसण्याऐवजी त्यावेळीच पाऊल उचलणे गरजेचे होते, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
'इंडिया'चा मोर्चा, खरगेंकडे स्नेहभोजन
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी सायंकाळी 'इंडिया' आघाडीतील खासदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, याच दिवशी बिहारमधील मतदार यादीच्या पुनरीक्षणावरून आणि निवडणुकीतील फसवणुकीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाचे खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढणार आहेत. या मोर्चानंतर हे सर्व खासदार स्नेहभोजनासाठी खरगे यांच्याकडे जाणार आहेत.