कुख्यात आंबेकरच्या बंगल्यावर मनपाने आजवर कारवाई का केली नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 20:30 IST2020-02-27T20:24:44+5:302020-02-27T20:30:10+5:30

कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने तब्बल ८८१.७१ चौरस मीटर क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करून सात वर्षापूर्वी आलिशान बंगला उभारला. असे असतानाही महापालिकेने या बंगल्यावर आजवर कारवाई केली नाही.

Why didn't the Municipal Corporation take action on the notorious Ambekar bungalow today? | कुख्यात आंबेकरच्या बंगल्यावर मनपाने आजवर कारवाई का केली नाही?

कुख्यात आंबेकरच्या बंगल्यावर मनपाने आजवर कारवाई का केली नाही?

ठळक मुद्देमंजुरी २१.३० ची : बांधकाम ९०३.०१ चौरस मीटर क्षेत्रात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने नागपुरातील हमालपुरा भागातील अवधूत रोड येथे तीन प्लॉट एकत्र करून ९०३.०१ चौरस मीटर जागेत अनधिकृत बंगला उभारला होता. सुरुवातीला १९९९ मध्ये आंबेकर याने २१.३० चौरस मीटर बांधकामाची मंजुरी घेतली होती. परंतु प्रत्यक्षात ९०३.०१ चौरस मीटर जागेत बांधकाम केले. म्हणजेच तब्बल ८८१.७१ चौरस मीटर क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करून सात वर्षापूर्वी आलिशान बंगला उभारला. असे असतानाही महापालिकेने या बंगल्यावर आजवर कारवाई केली नाही. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अतिक्रमण व अवैध बांधकामाविरोधात धडक कारवाई सुरू केल्याने आंबेकरच्या आलिशान बंगल्यावर बुधवारी कारवाईला सुरुवात झाली.


वास्तविक या बंगल्याचा परिसर पाच भूखंडांवर आहे. त्यातील दोन भूखंडांवर जिम व लॉन आहे. उर्वरित तीन भूखंडांवर हा संपूर्ण बंगला उभारण्यात आला. बंगल्यावर १५ ते १६ कोटींचा खर्च आला आहे. काही वर्ष बांधकाम सुरूअसूनही महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. वेळीच कारवाई झाली असती तर हा बंगला उभा राहिला नसता.
आंबेकरच्या धास्तीमुळे या बंगल्यावर मनपाने कारवाई केली नाही. बंगला अनधिकृत असतानाही यासंदर्भातील फाईल झोनमध्ये पडून होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केल्यानंतर या अनधिकृत बांधकामाची माहिती तपासात पुढे आली. पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर बंगला पाडण्याला तातडीने सुरुवात करण्यात आली. मुंढे यांच्यामुळेच मनपा अधिकाऱ्यांना कारवाई करावी लागली.
चार महिन्यांपूर्वी याच बंगल्याशेजारी असलेल्या चार माळ्याच्या इमारतींवर कारवाई करण्यात आली. मात्र, आंबेकरच्या बंगल्यावर कारवाई होत नव्हती. पुढील दोन दिवसात हा बंगला जमिनदोस्त होईल, असा दावा करण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा तोडकामाला सुरुवात करण्यात आली.

Web Title: Why didn't the Municipal Corporation take action on the notorious Ambekar bungalow today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.