काटोल : काटोल तालुक्यात मका व ज्वारी उत्पादकाकरिता शासकीय खरेदी केंद्र ३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले. यात ज्वारीकरिता हेक्टरी ४.७३ व मकाकरिता १२ क्विंटल हेक्टरी उत्पादन अशी अट ठेवण्यात आली आहे. ती रद्द करण्यात यावी. यासोबतच दोन्ही पिकांची सरसकट खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. शासनाच्या हेक्टरी पीक उत्पादनाच्या अटीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. यंदा तालुक्यात ज्वारी व मक्याचे चांगले उत्पादन झाले आहे. शासकीय खरेदी केंद्रावर ज्वारीला २६०० तर मक्याला १८५० रुपये भाव मिळतो आहे. परंतु ज्वारीकरिता हेक्टरी ४.७३ व मकाकरिता १२ क्विंटल प्रति हेक्टरी अशी अट ठेवण्यात आली आहे. ही अगदी नगण्य अशी खरेदी असल्याने उर्वरित ज्वारी व मका खूल्या बाजारात कमी दरात विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
----
ज्वारी व मका पिकाचे उत्पादन यंदा चांगले झाले आहे. मालाला चांगला भाव मिळणे अपेक्षित होते. मात्र शासनाने टाकलेल्या अटीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
एस.झामडे,ज्वारी व मका उत्पादक शेतकरी