कुणाची पाठ कुणाकडे ?
By Admin | Updated: August 23, 2014 03:13 IST2014-08-23T03:13:30+5:302014-08-23T03:13:30+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचार झंझावातात संघभूमी नागपूरला टाळून इतरत्र सभा घेणाऱ्या मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर नागपूरमध्ये ...

कुणाची पाठ कुणाकडे ?
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचार झंझावातात संघभूमी नागपूरला टाळून इतरत्र सभा घेणाऱ्या मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर नागपूरमध्ये शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने सभा घेतली खरी पण त्यात ना उल्हास होता ना उत्साह. भाषणावरही ‘लाल किल्ल्या’ची छाप होती. विशेष म्हणजे वाजपेयी आणि अडवाणींच्या जाहीर सभेला दिसणारी संघ विचाराची मंडळी या सभेला नव्हती. त्यामुळे त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या खुर्च्याही रिकाम्याच राहिल्या.
एकीकडे ग्रामीण भागातील (मौदा) सभेला गर्दी होते व शहरात लोकं पाठ फिरवितात हा प्रकार तसा अनाकलनीय आहे. यातून काही प्रश्न निर्माण झाले आहेत. पावसामुळे गर्दी कमी झाली की मोदी संघ मुख्यालयी न गेल्याने नाराज स्वयंसेवकांनीच त्याकडे पाठ फिरविली, पक्षातील अंतर्गत धूसफूस यासाठी कारणीभूत ठरली की मोदींची क्रेझ कमी झाली या सर्व प्रश्नांवर आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नाव निश्चित झाल्यापासून तर थेट पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारण्यापर्यंत कायम प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या मोदी यांचा नागपूरमधील दौरा हा आगळा वेगळा संदेश देणारा तसेच गर्दीचे उच्चांक मोडणारा असेल असा अंदाज होता.
काँग्रेसच्या काळात अंतिम टप्प्यापर्यंत गेलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे घाईगडबडीत भूमिपूजन करण्याचा घाट हा आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवूनच रचण्यात आला होता. त्यामुळेच भूमिपूजनाचा कार्यक्रम ‘राजकीय’व्हावा यासाठी भाजपची संपूर्ण यंत्रणा दोन आठवड्यापासून कामाला लागली होती. संघाचा गड, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांच्या कर्मभूमीत ही सभा होणार होती. मात्र, तरीही सभेला अपेक्षित गर्दी झाली नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी याच मैदानावर घेतलेल्या कार्यक्रमाच्या तुलनेत मोदींच्या कार्यक्रमाला झालेली गर्दी निम्मीही नव्हती. त्यामुळेच कदाचित मोदींचे भाषण रंगले नसावे. मात्र तरीही मोदींनी कल्पकतेने सभा जिंकण्याचा प्रयत्न केला.
मोदींविषयी जनतेत विशेषत: तरुणांमध्ये आकर्षण होते. मोदी काय बोलतील, याची उत्सुकता होती. मात्र, मोदी नेहमीच्या शैलीत बोलले नाही. सभा जिंकण्याचा सूर त्यांना गवसलाच नाही. कदाचित शासकीय कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी स्वत:ला सावरले असेल. पण श्रोत्यांना हवे असलेले मोदी या सभेत दिसले नाहीत.
मुख्यमंत्र्यांनी सभेवर घातलेला बहिष्काराचाही मुद्दाही या सभेच्या निमित्ताने देशभर गाजला. नागपूर सुधार प्रन्यास, महापालिका आणि राज्य शासनाचा मेट्रो रेल्वे प्रकल्पात सहभाग असतानाही राज्याच्या मुख्यमंत्र्यानाच विश्वासात न घेता कार्यक्रम घेणे संकेताला धरून नसल्यानेच त्यावर टीका झाली. त्यामुळेच केंद्रीय नगर विकास मंत्र्यांना नागपूरमध्येच पुण्याच्या मेट्रोला मंजुरी देण्याचे आश्वासन द्यावे लागले.
मोदींचे वेगळे रूप या सभेच्या निमित्ताने दिसले. त्यांनी त्यांच्या भाषणात महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचा आदराने उल्लेख केला. गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वच्छतेची मोहीम राबविण्याचा मानसही त्यांनी संघाच्या भूमीतच व्यक्त केला. यातून मोदी यांनी त्यांची कट्टरवादी प्रतिमा बदलण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न दिसून येतात.(प्रतिनिधी)