चुकतेय कोण ?
By Admin | Updated: November 26, 2014 01:08 IST2014-11-26T01:08:16+5:302014-11-26T01:08:16+5:30
उपराजधानीत रस्त्यांवरील वाढत्या वर्दळीसोबतच अपघाताचे धोकेही वाढले आहेत. वाहनचालक वाहतुकीचे नियम धुडकावत वेगाने व बेशिस्तीने वाहने चालविताना नजरेस पडतात.

चुकतेय कोण ?
पोलिसांची निष्क्रियता : सिग्नल तोडले तरी थांबविले नाही
नागपूर : उपराजधानीत रस्त्यांवरील वाढत्या वर्दळीसोबतच अपघाताचे धोकेही वाढले आहेत. वाहनचालक वाहतुकीचे नियम धुडकावत वेगाने व बेशिस्तीने वाहने चालविताना नजरेस पडतात. परंतु पोलीसही तेवढ्याच बेशिस्तीने विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्याकडे दुर्लक्ष करतात. लोकमतच्या चमूने मंगळवारी शहरातील अतिवर्दळ असलेल्या नऊ चौकांना भेटी दिल्या आणि एका मोटारसायकलस्वारास विरुद्ध दिशेने वाहन चालविण्यास सांगितले आणि पोलिसांची निष्क्रियता अनुभवली. अनेक अतिवर्दळीच्या चौकात तर पोलीसच नव्हते. जिथे होते त्या चौकातील एका कोपऱ्यात सावलीच्या ठिकाणी फक्त उभे होते. मोटारसायकलस्वार सिग्नल तोडून, विरुद्ध दिशेने गेला तरी त्यांचे दुर्लक्ष होते, ज्यांचे लक्ष होते त्यांनी पाहूनही न पाहिल्यासारखे केले.
लॉ कॉलेज चौक
मोटारसायकल चालकाने आपला प्रवास सुरू केला तो ‘लॉ कॉलेज चौकातून’. याच चौकात सोमवारी अॅड. विजया बोडे यांना एका वाहनाने चिरडले. या चौकात आज एक नव्हे तर दोन वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. परंतु हे दोन्ही पोलीस चौकाच्या एका कोपऱ्यात, इमारतीच्या सावलीत उभे होते. वाहनचालकाने अगदी वाहतूक पोलीस शिपायाच्या समोरून विरुद्ध दिशेने वाहन चालवीत नेले. याशिवाय लाल दिव्यातही सिग्नल तोडले. सिग्नलवर नियुक्त पोलीस आपल्याच तंद्रीत होता. त्याचे याकडे लक्ष असूनही न पाहिल्यासारखे केले. साधी शिटीही वाजविली नाही.
कॉटन मार्केट चौक
कॉटन मार्केट चौकाच्या एका कोपऱ्यात तीन पोलीस गप्पा गोष्टीत रंगले होते. चार-पाच मिनिटानंतर एक पोलीस व्हॅन आली. त्यातील चालक आणि एक वाहतूक पोलीस असे सर्व मिळून श्री गणेश भोजनालयात जेवण्यासाठी गेले. चौकात पोलीस नसल्याचे पाहत अनेकांनी सिग्नल तोडण्याची स्पर्धाच लावली. आमच्या मोटारसायकलनेही या स्पर्धेत भाग घेतला. एक-दोन नव्हे तर चार-पाच वेळा सिग्नल तोडला.
व्हेरायटी चौक
व्हेरायटी चौकात बुथच्या बाहेर एक पोलीस शिपाई उभा होता, तर ‘अॅडिशनल स्पेशल ट्राफिक आॅफिसर’ अर्थात सामाजिक कार्यकर्ता हा ‘वन वे’कडून येणाऱ्यांना पकडण्यासाठी तैनात होता. आमचा मोटारसायकल स्वार रिजंट टॉकीजकडून विरुद्ध दिशेने व्हेरायटी चौकात आला. चौकाच्या मधोमध मार्गाच्या विरुद्ध दिशेने झेब्रा क्रॉसिंगवर बराच वेळ उभा होता. परंतु त्या पोलिसाचे लक्षच गेले नाही. त्याचे पूर्ण लक्ष कोणी दुचाकीस्वार विद्यार्थी मिळतो का, याकडेच होते. पोलिसाकडे पाहत मोटारसायकलस्वाराने लाल दिव्यात वाहन टाकले, मात्र साधी शिटीही त्या शिपायाने मारली नाही. विशेष म्हणजे, सीताबर्डी पोलीस ठाण्याच्यासमोर दोन वाहतूक पोलीस गप्पा मारीत होते, त्यांचेही याकडे लक्ष नव्हते.
झाशी राणी चौक
शहराचे हृदय असलेल्या झांशी राणी चौकात दुपारचे २ वाजले असताना एकही पोलीस दिसून आला नाही. पोलीस बुथजवळच सहा सिटर आॅटोरिक्षा उभी करून एक चालक प्रवाशांना ओरडून-ओरडून बोलवित होता. तिथे इतरही आॅटोचालकांनी गर्दी केली होती. आमच्या मोटारसायकलस्वाराने सिग्नल तोडत रस्त्याच्या मधोमध वाहन उभे केले. साधारण तीन-चार मिनिटापर्यंत वाहन उभे होते. परंतु कोणीच हटकले नाही. मात्र, एका वृद्ध वाहनचालकाने ‘मरना है का’ असे म्हणत तेथून जाण्यास सांगितले. विशेष म्हणजे नेहमीच या चौकात विरुद्ध दिशेने आॅटोचालक रहदारी करीत असतात, मात्र आतापर्यंत एकाही चालकावर कारवाई झालेली नसल्याची माहिती आहे.
हे आहेत नियम आणि कायदे
विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यास मोटार वाहन कायद्याचे कलम ११९/१७७ अन्वये दोषी ठरवून त्याच्याकडून १०० रुपये दंड आकारल्या जाऊ शकतो. वाहनचालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसेल तर त्याला पुन्हा ६०० रुपये, इन्श्युरन्स नसेल तर ६०० रुपये, सिग्नल तोडल्यास १०० रुपये, नो पार्किंगमध्ये वाहन ठेवल्यास १०० रुपये व वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास ६०० रुपये असा दंड वसूल केला जाऊ शकतो. वाहतूक पोलिसांना दररोज दहा कारवाया करण्याची सक्ती आहे. परंतु अनेक कर्मचारी याच्या आड लाच घेत असल्याचे चित्र आहे.
सिग्नल तोडण्यात तरुणीही आघाडीवर
चौकात वाहतूक पोलीस असतील तरच नियम पाळायचा नाहीतर तोडायचा ही प्रवृत्ती शहरात वाढत आहे. ज्या चौकाच्या एका कोपऱ्यात सावलीत पोलीस उभे असतात तो मार्ग सोडल्यास इतर मार्गावरील लाल दिव्यात वाहन दामटतात. वाहतूक पोलिसांच्या अपुऱ्या संख्येमुळे सामूहिकपणे सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात बहुसंख्य तरुणांसोबतच तरुणीही आघाडीवर असल्याचे आजच्या ‘लोकमत इन्व्हेस्टिगेशन’मध्ये दिसून आले.