काम कुणाचे, श्रेय कुणाला?

By Admin | Updated: September 7, 2016 02:55 IST2016-09-07T02:55:43+5:302016-09-07T02:55:43+5:30

निवडणुका जवळ आल्यामुळे अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांना प्रसिद्धीची ओढ लागली आहे. एकाच कामाच्या दोन वेगवेगळ्या विभागाकडून प्रेसनोट काढण्यात येत आहे.

Who is the work, who is credited? | काम कुणाचे, श्रेय कुणाला?

काम कुणाचे, श्रेय कुणाला?

पदाधिकाऱ्यांना लागली प्रसिद्धीची ओढ : एकाच कामाच्या दोन प्रेसनोट
नागपूर : निवडणुका जवळ आल्यामुळे अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांना प्रसिद्धीची ओढ लागली आहे. एकाच कामाच्या दोन वेगवेगळ्या विभागाकडून प्रेसनोट काढण्यात येत आहे. त्यामुळे काम कुणाचे आणि श्रेय कुणाला द्यावे या पेचात ग्रामीण जनता पडलेली आहे. परंतु श्रेय लाटण्याच्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला आहे.
जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) ने जिल्हा परिषदेने दिलेल्या एका प्रस्तावाला निधीची मंजुरी दिली आहे. परंतु हे काम पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपणच मंजूर करून आणले आहे, असा काहीसा आव जि.प. अध्यक्ष आणत आहे. पालकमंत्र्यांशी वारंवार भेटून त्यांना हा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केल्यामुळे जिल्ह्यात रस्त्यासाठी १६.५० कोटी तर ‘क ’ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ७.४५ कोटी मिळाल्याचे त्यांनी पाठविलेल्या प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट होत आहे. परंतु मुळात हे काम जि.प.च्या उपाध्यक्षांकडे असलेल्या बांधकाम विभागाचे आहे. या कामाला निधीची मंजुरी मिळताच उपाध्यक्षांनी ताबडतोब प्रेसनोट काढून पंचायत समितीनिहाय कामांचे वाटप झाल्याची माहिती आकडेवारीसह २२ आॅगस्टलाच घोषित करून दिली. त्यांनी सुद्धा आपल्या प्रेसनोटमध्ये पालकमंत्र्यांचे कामाला मंजुरी दिल्याबद्दल आभार मानले. मात्र अध्यक्षांना त्यातून डावलले.
याच विषयाची प्रेसनोट ३ सप्टेंबरला जि.प. अध्यक्षांनी प्रसिद्ध केली. त्यांनी सुद्धा प्रेसनोटमध्ये पंचायत समितीनुसार ‘क ’ वर्ग तीर्थक्षेत्र व रस्त्याला मिळालेल्या मंजुरीची आकडेवारी व निधी प्रसिद्ध केली. पालकमंत्र्यांनी मंजुरी दिल्याबद्दल आभार मानले. फक्त बांधकाम विभागातून रस्त्यासंदर्भात प्रस्ताव गेल्याचा उल्लेख केला. परंतु बांधकाम समितीच्या सभापतींना स्थान दिले नाही.
मुळात मंजूर झालेल्या कामाचे नियोजन, सदस्यांकडून कामाची मागणी, जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे त्यासाठी करावा लागणारा पाठपुरावा बांधकाम सभापतींकडूनच झाला आहे. असे असले तरी, काम जिल्हा परिषदेचे आहे.
बांधकाम सभापतींनी कामाचे श्रेय लाटताना अध्यक्ष म्हणून त्यांचा उल्लेख करणे गरजेचे होते. अध्यक्षांनीही प्रेसनोट काढताना बांधकाम सभापतींचा उल्लेख करणे गरजेचे होते. अथवा संयुक्त प्रेसनोट काढणे अपेक्षित होते. परंतु असे न करता अध्यक्ष, उपाध्यक्षांनी स्वतंत्र प्रसिद्ध पत्रक काढून दोघांमध्ये समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आणून दिले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Who is the work, who is credited?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.