नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये कोण मारणार मैदान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:50 AM2019-07-24T11:50:52+5:302019-07-24T11:53:37+5:30

२०१४ मध्ये चौरंगी लढतीत कॉँग्रेसला चारही खाणे चित करणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघात यावेळी भाजपचे विद्यमान आमदार सुधीर पारवे विजयाची हॅट्ट्रिक करणार का, यावर राजकीय पोलपंडिताकडून तर्कवितर्क लावले जात आहे.

Who will win in Umred constituency in Nagpur district? | नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये कोण मारणार मैदान?

नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये कोण मारणार मैदान?

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेस देणार का नवा चेहरा ?राष्ट्रवादीचाही दावाबसपाचा हत्ती कुणाचा करणार घात?वंचित वाढविणार प्रस्थापितांची डोकेदुखी

जितेंद्र ढवळे / अभय लांजेवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर  : २०१४ मध्ये चौरंगी लढतीत कॉँग्रेसला चारही खाणे चित करणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघात यावेळी भाजपचे विद्यमान आमदार सुधीर पारवे विजयाची हॅट्ट्रिक करणार का, यावर राजकीय पोलपंडिताकडून तर्कवितर्क लावले जात आहे. इकडे काँग्रेसची यंग ब्रिगेड पारवे यांच्या विजयरथाला ब्रेक लावण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र बसपाची गतवेळची कामगिरी, वंचित बहुजन आघाडीचे नवे आव्हान यातच राष्ट्रवादीने या मतदार संघात केलेला दावा विचारात घेत उमेरडचे मैदान मारताना काँग्रेसला घाम फुटणार आहे.
लोकसभेत कृपाल तुमाने यांना २२ हजार ९७० मतांची लीड मिळाल्याने येथे पुन्हा भाजपची छाती फुगली आहे. एकेकाळी काँग्रेसचा गढ मानल्या जाणाºया या मतदार संघात भाजपने संघटनेच्या बळावर गत दशकभरात पकड मिळविली. यापूर्वी माजी राज्यमंत्री तथा नागपूर जिल्हा ग्रामीण कॉँग्रेस कमिटीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी या क्षेत्रात विकासकामांनी मतदारांना प्रभावित केले. २००४ मध्ये मुळक जिंकले. अशातच २००९ मध्ये हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. यामुळे मुळक यांना या मतदारसंघातून कामठीत जावे लागले.
२००९ मध्ये जिल्हा परिषद सदस्य सुधीर पारवे यांना भाजपाने संधी दिली. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे पानीपत करीत शिरीष मेश्राम यांचा ४४,६९६ मतांनी पराभव केला. २०१४ मध्ये मोदी लाटेत पारवे यांच्या मताधिक्यात पुन्हा वाढ झाली. पारवे यांनी ९२,३९९ मते घेत बसपाच्या वृक्षदास बन्सोड यांना ५८,३२२ मतांनी पराभूत केले. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार राजू पारवे यांनी २३,४९७ मते मिळवित उमरेडच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली. चौरंगी लढतीत येथे काँग्रेसचे संजय मेश्राम चौथ्या क्रमांकावर गेले. सलग दोनदा विजय मिळाल्यानंतर भाजप येथे सुधीर पारवे यांना हॅट्ट्रिक करण्याची संधी देण्याची शक्यता आहे.
भाजपमध्ये सुधीर पारवे यांच्यासोबतच डॉ. शिरीष मेश्राम, अरविंद गजभिये, प्रतिभा मांडवकर हेही इच्छुकांच्या यादीत आहेत. गतवेळी भाजपला टक्कर देणाºया बसपाकडून याहीवेळी वृक्षदास बन्सोड यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. बसपाकडून येथे सुभाष गजभिये व राजकुमार लोखंडे हेही दावेदार आहेत. दलित आणि बहुजन मतदारावर भिस्त असलेल्या या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीनेही लक्ष केंद्रीत केले आहे. वंचितकडून राजू मेश्राम उमरेडची खिंड लढविण्याच्या तयारीत आहेत.
कॉँग्रेसमध्ये येथे दावेदारांची संख्या मोठी आहे. यात विधानसभा प्रमुख संजय मेश्राम, युवा नेते राजू पारवे यांच्यासह महादेव नगराळे, नत्थू लोखंडे, राहुल घरडे, प्रमोद घरडे, राजेश मेश्राम, गजानन जांभुळकर, विश्वनाथ मेंढे, जॉनी मेश्राम, प्रशांत ढाकणे, यशवंत मेश्राम यांनीही पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केला आहे.

काँग्रेसचे सस्पेंन्स
उमरेडमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीबाबत ‘सस्पेंस’ राखल्या जात आहे. यातच राष्ट्रवादीने उमरेडवर दावा केला आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये निवडणुकीपूर्वीच तिकीट मिळविण्यासाठी घमासान होणार आहे. गतवेळी काँग्रेसने संजय मेश्राम यांना संधी दिली होती. यानंतर त्यांनी गत पाच वर्षांत पक्षबांधणीवर अधिक भर दिला. अशातच राजू पारवे यांच्या एन्ट्रीमुळे उमेदवाराची निवड करताना येथे कॉँग्रेस नेतृत्वाचा कस लागणार आहे.

परातेंच्या हॅट्ट्रिकची पारवे करणार का बरोबरी ?
माजी मंत्री डॉ. श्रावण पराते यांनी १९८५, १९९० आणि १९९५ अशा सलग तीन विधानसभा निवडणुकीत विजय संपादन केला आहे. उमरेडमध्ये हॅट्ट्रिक साधणारे ते एकमेव आमदार आहेत. त्यांनी चवथ्यांदाही निवडणूक लढविली होती. परंतु त्यावेळी अपक्ष उमेदवार वसंत इटकेलवार यांनी त्यांचा पराभव केला. आता सलग दोन टर्म आमदार असलेले सुधीर पारवे तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत. यामुळे ते विजयाची हॅट्ट्रिक करून पराते यांच्या रेकॉर्डची बरोबरी साधतील का, याकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Who will win in Umred constituency in Nagpur district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.