जिल्हाधिकार्यांकडून आढावा
नागपूर:
लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतमोजणीला एक दिवस शिल्लक असताना विविध वृत्त वाहिन्यांनी निकालाच्या बाबतीत त्यांचे अंदाज जाहीर केल्यामुळे प्रत्यक्षात निकाल काय लागतो याबाबत कमालीची उत्कंठा वाढली आहे. १० एप्रिल रोजी जिल्ह्यात रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. एकूण १०५०५५९ तर नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण १०८५०२१ मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला होता. शुक्रवारी १६ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून कळमना मार्केट यार्डमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी आवश्यक ती सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे.
कर्मचार्यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले असून दुसर्या टप्प्यातील प्रशिक्षण गुरुवारी मतमोजणी स्थळी होणार आहे. सकाळी ११ वाजतापासून या प्रशिक्षणाला सुरुवात होईल. आज जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी तयारीच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रदीपकुमार डांगे उपस्थित होते. कृष्णा यांनी यावेळी विविध सूचना अधिकार्यांना केल्या. रामटेक आणि नागपूर मतदारसंघासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणी होणार असून एकूण २४० टेबल यासाठी तयार ठेवण्यात आले आहेत. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण १२ विधानसभेचे मतदारसंघ आहेत. बारा ‘डाटा’ आॅपरेटरच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मतमोजणी कर्मचारी, उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्यासाठी २५० कुलर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचार्यांसाठी अल्पोपहार आणि पाण्याची व्यवस्था जागेवर करण्यात आली आहे. प्रसिद्धी माध्यमांसाठी विशेष कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान मतमोजणीच्या पूर्वीच विविध वृत्त वाहिन्यांनी निकालाच्या बाबतीत अंदाज व्यक्त केल्याने राजकारण तापले आहे. या अंदाजाबाबत मतमतांतरे असली तरी प्रत्यक्षात निकाल काय लागतो याबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. (प्रतिनिधी)